जागा २४ हजार; विद्यार्थी ३२ हजार ६00

0
5

नागपूर : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणार्‍या अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ‘एमएचटी-सीईटी’मध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सुमारे २४ हजार जागांसाठी ३२ हजार ६00 विद्यार्थी पात्र झाले आहेत. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २६ हजार ५९८ तर गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठातील ६ हजार १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने नव्या नियमांनुसार प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. नागपूर विभागात मागील वर्षी ५९ अभियांत्रिकी महाविद्यालयांत २६ हजार जागा होत्या. यंदा चार महाविद्यालये बंद झाल्याने जागांची संख्या कमी झाली आहे. प्रवेशप्रक्रियेच्या वेळी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी संचालनालयातर्फे विभागात ४८ सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. येथे विद्यार्थ्यांना अगोदर नोंदणी करायची आहे. त्यानंतर ‘ऑनलाईन’ अर्ज व कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये यासाठी सुविधा केंद्रांमध्ये सूचना अधिकार्‍यांना नियुक्त करण्यात आले आहे.