अर्जुनी मोरगाव,दि.24ः-शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय, अर्जुनी/मोरगाव येथे दिनांक 23 जानेवारी 2024 रोज मंगळवार ला “इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स : स्टार्टअप अँड इनोव्हेशन” या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यशाळेत डॉ. के. जे. सीबी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.भारत सरकारच्या “राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलेक्चुअल प्रोपर्टी अँड मॅनेजमेंट”, नागपूरचे भारत एन सूर्यवंशी, असिस्टंट कंट्रोलर ऑफ पेटंट एंड डिझाईन यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले.
पेटंट कोणी करावे, कसे करावे, त्याकरिता कोणते फॉर्म भरावयाचे असतात, त्याचा फी स्ट्रक्चर, पेटंटची वैधता कालावधी, पेटंटचे प्रकार, पेटंट, डिझाईन, ट्रेडमार्क आणि कॉपीराईट या क्षेत्रात विद्यार्थ्यांकरिता असलेले करिअर संबंधी उपलब्धता इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन मा. सूर्यवंशी यांनी केले.
या कार्यशाळेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सह देशातील इतर विद्यापीठातील शिक्षकांनी व संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मदुराई कामराज यूनिवर्सिटी,मदुराई; पारूल युनिव्हर्सिटी,वडोदरा; नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी,जळगाव; संत गाडगेबाबा विद्यापीठ,अमरावती; गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली; शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे; हिमाचल प्रदेश युनिव्हर्सिटी,शिमला व इतर विद्यापीठातील एकूण 443 शिक्षक व संशोधक विद्यार्थ्यांनी नोंदणी करून सहभाग घेतला.
महाविद्यालयातील “इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन सेल” चे समन्वयक डॉ.डी. एल. चौधरी आणि त्यांच्या चमूने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेचे संचालन डॉ चौधरी आणि आभारप्रदर्शन डॉ पालीवाल यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी समन्वयक डॉ. चौधरी, डॉ. गोपाल पालीवाल, तसेच सदस्य डॉ. नितीन विलायतकर, प्रा. लक्ष्मीकांत कापगते, प्रा. पंकज उके, प्रा. अंकित नाकाडे, डॉ सतीश बोरकर, प्रा. अजय राऊत इत्यादींनी सहकार्य केले.