‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करा- अनिल पाटील

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया, दि.31 : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबविले जात असून या अभियानांतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची जिल्ह्यात यशस्वीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी दिले.

           जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कादर शेख, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (DIET) प्राचार्य रमेश राऊत यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

          श्री. पाटील पुढे म्हणाले, ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे सदर योजनेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत 478 शाळांचा समावेश असलेला सदर योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित केलेला आहे. सदर योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राबविण्यात येत आहे. या अभियानाचा अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृध्दिंगत करण्यासाठी प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभुत कला-क्रीडा गुणांचा विकास अशा अनेकविध घटकांचा यात अंतर्भाव आहे. अशा महत्वपूर्ण घटकांना योग्य त्या प्रमाणात प्राधान्य दिल्यास शाळेचा सर्वांगिण विकास निश्चितपणे होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

            विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे. शिक्षणासाठी पर्यावरण पुरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे. क्रीडा, आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणे. राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे. राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे. विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्व पटवून देणे. विद्यार्थ्यांच्या अंगभुत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण करणे. शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे आदी या अभियानाची उद्दिष्टे आहेत असेही त्यांनी सांगितले.

           कादर शेख म्हणाले, या अभियानांतर्गत शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तीमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, तंबाखु मुक्त शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा अशाप्रकारच्या उपक्रमांवर या अभियानाच्या माध्यमातून गुणांकन करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर अभियान शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार करुन कामे करावीत असे त्यांनी सांगितले.

         सभेला सर्व गटविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याधिकारी व इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.