कुष्ठरोग मुक्त भारत संकल्प साध्य करण्यासाठी स्पर्श अभियान- डॉ. रोशन राऊत

0
10

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाला सुरुवात

       गोंदिया, दि.31 : केन्द्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ३० जानेवारी ते 13 फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जिल्हयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना दरम्यान जनजागृती व सर्वेक्षणावर विशेष भर देण्यात येणार आहे. कुष्ठरोगा बाबतची जनजागृती ग्रामीण व शहरी भागात तळागाळापर्यंत पोहचवुन कुष्ठरोग मुक्त भारत हा संकल्प साध्य करणे हे हया स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाचा उद्देश असल्याची माहिती सहायक संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग) डॉ. रोशन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. अभियाना दरम्यान नागरीकांनी कुष्ठरोग आजाराबाबत गैरसमज व भीती न ठेवता आपल्याला होणारा त्रास न लपवता घरी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

        कुष्ठरोग हा आजार संपुर्ण उपचाराने बरा होऊ शकतो, म्हणुन नागरीकांनी प्राथमिक स्तरावर जाणवनारे लक्षणे आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. लवकर निदान व तत्पर उपचार केल्यास कुष्ठरोग नक्कीच हमखास बरा होतो. या आजारावरील औषधी सर्व सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. कुष्ठरुग्णाचे प्रमाण दर दहा हजारी लोकसंख्या मागे १ पेक्षा कमी करणे, कुष्ठरोग विकृती दर्जा २ चे प्रमाण शून्य आणणे, कुष्ठरोगाबाबत असलेली अंधश्रध्दा व गैरसमज दूर करणे, कुष्ठरोगा बाबतची जनजागृती ग्रामीण व शहरी भागात तळागाळापर्यंत पोहचवुन कुष्ठरोग मुक्त भारत हा संकल्प साध्य करणे हे हया स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे उद्देश आहे.

         यावर्षी अभियानात कलंक कुष्ठरोगाचा मिटवु या, सन्मानाने स्विकार करू. याचा सर्वत्र जागर होणार आहे. महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ३० जानेवारी कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. या पंधरवाड्यात नुक्कड नाटिकाव्दारे जनजागृती करणे तसेच जिल्ह्यातील रोगमुक्त झालेल्याचे मनोगत, खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांची कार्यशाळा, शाळेमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञाचे वाचन करणे, शाळेतील सुचना फलकावर कुष्ठरोगाबाबतचे संदेश लिहिणे, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, रांगोळी स्पर्धा व पथनाट्य, कुष्ठरोगावरील म्हणी/घोषवाक्य शालेय विद्यार्थी प्रभातफेरी तसेच कुष्ठरोग दौड मॅराथानचे आयोजन इत्यादी विविध कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

         कुष्ठरुग्णाबाबत समाजात भेदभाव न होता सन्मानाने जगण्यासाठी समाजातीज सर्व घटकांनी प्रयत्न करावे व प्रत्येक कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक कारणाने कुष्ठरोग लपविण्याकडे लोकांचा विशेषत: महिला-भगीनींचा कल असतो. आरोग्य विभागाने सोशल मिडीया, सामाजिक संस्था व इतर माध्यमांव्दारे लोकांचे प्रबोधन करुन योग्य उपचाराने हा आजार बरा होतो असा विश्वास देऊन जास्तीत जास्त संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरुग्ण प्रसाराचे ध्येय गाठण्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.