
देवरी, ता. १९ :”शिवाजी महाराजांचे चरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी असून पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये असंख्य पिढ्यांना आदर्श ठरणारे शिवरायांचे चरित्र प्रेरणादायी ठरते. बहुजनांच्या कल्याणासाठी झटणारा राजा महाराष्ट्रात निर्माण होणे संपूर्ण देशाचे भाग्य आहे.” असे प्रतिपादन मा. श्री. राजकुमार बडोले यांनी स्थानिक छत्रपती शिवाजी संकुलमध्ये दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोज सोमवारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले हे होते. प्रमुख वक्ते व मार्गदर्शक प्रवीण देशमुख, माजी आमदार संजय पुराम, गोंदियाचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नित्यानंद झा,देवरीच्या पंचायत समिती सभापती अंबिकाताई बंजार,नगराध्यक्ष संजय उईके, कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे, उपाध्यक्ष डॉ. सुनिल येरणे, सचिव अनिल येरणे, भाजपचे विरेंद्र अंजनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक निखिल पिंगळे यांनी, “आजच्या घडीला विद्यार्थ्यांनी स्पर्धा करायची असेल तर प्रथम स्वतःशी स्पर्धा करावी नंतर शिक्षकांशी स्पर्धा करावी आणि केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञानार्जन करून स्वामी विवेकानंद यांच्या सारखे स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे.” असे प्रतिपादन केले.
तसेच प्रमुख वक्ते प्रवीण देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनातून “आजच्या पिढीने आपल्या देशाचा इतिहास विसरून चालणार नाही. या देशातील महामानवांचे चरित्र प्रत्येकांनी वाचावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र प्रत्येकांनी वाचावे. शिवरायांच्या चरित्रातून आपल्याला प्रचंड प्रेरणा मिळते. शिवचरित्राची ज्योत सर्वांच्या काळजात नेहमी तेवत ठेवावी.” असे प्रतिपादन केले.
दरम्यान, देवरीचे प्रकल्प अधिकारी विकास एस. राचेलवार, डॉ. श्री. दिपक धुमणखेडे या सत्कारमूर्तींचे स्वागत व सत्कार यासह वर्ग १०वी व १२वी मध्ये तालुक्यातून प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व या वर्षीपासून प्रथमच CBSE दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पालकासह स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवनातील महत्वपूर्ण घटनांवर आधारित विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल येरणे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुनिल येरणे यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. एस. टी. मेश्राम व कु. मनिषा भालेराव यांनी केले.