देवरी,दि.२१-स्थानिक छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित व शासकीय शाळांचे केंद्रस्तरीय प्राप्त अहवालानुसार तालुका मुल्यांकन समिती मार्फत मुल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये खाजगी अनुदानित व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल संलग्न कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
त्याबद्दल शाळेतील प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती व पर्यवेक्षिय यंत्रणेचे अभिनंदन कृष्णा सहयोगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे आणि संस्थेचे सचिव अनिल येरणे यांनी केले आहे. तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला बद्दल विद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी येथे “आगाज २.०” तीन दिवसीय वार्षिकोत्सवाचे थाटात उद्घाटन
देवरी- स्थानिक छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी येथे “आगाज २.०” तीन दिवसीय वार्षिकोत्सवाचे आज (दि.२१) बुधवारी थाटात उद्घाटन पार पडले.
“आगाज २.०” चा उद्घाटन कार्यक्रम डॉ. राजेंद्र बी. काकडे,ॲडव्हायझर, ए.आय.सी.टी.ई., नवी दिल्ली यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे हे होते. प्रमुख अथिथी म्हणून प्रा. डॉ. भगवान एफ. जोगी, मुंबई, प्रा. डॉ. चंद्रहास डी. गोलघाटे,गोंदिया, डॉ. हेमंत कोटांगले, सेवानिवृत्त प्राध्यापक, काटोल, अनिल येरणे, कृष्णा येरणे, प्रा. उपदेश लाडे,शाजिया पठाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनातून डॉ. काकडे यांनी छत्रपती शिवाजी संकुलमध्ये दिल्लीसारख्या उच्च स्तरीय भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी रिसर्च कामांवर लक्ष केंद्रित करून स्वतः ची प्रगती साधली पाहिजे. भविष्यात ए.आय.सी.टी.ई., नवी दिल्ली कडून विद्यार्थ्यांना आवश्यक विद्यावेतन व इतर आर्थिक सहकार्य केले जाईल. असे मनोगत व्यक्त केले. यावेळा बोलताना संस्थेचे अध्यक्ष येरणे म्हणाले, या संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राथमिक ते उच्च तंत्रशिक्षणाच्या सोई मिळतात व भविष्यात वैद्यकीय शिक्षणाची सोय लवकरच सुरू केली जाईल. याप्रसंगी “शब्दांकन” या मॅगझीनचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अधिव्याख्याता चंद्रशेखर बडवाईक व कल्याणी निर्वाण, यांनी केले. उपस्थितांचे आभार टिना लिचडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.