देवरी,दि.२७- सर्वत्र खासगी शाळांचा बोलबाला असताना आणि वीस वर्षापूर्वीपासून अडगळीत टाकलेली स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज लागलेल्या दहावीच्या निकालात आपल्या यशाचा डंका पिटला. अपूरी संसाधने असताना शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीने अखेर घवघवीत यश संपादन केले. परिणामी, जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापनाचे आणि विद्यार्थ्यांचे आज सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. उल्लेखनीय म्हणजे या वर्षी घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत या विद्यालयाने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीमुळे येथील सोयीसुविधा आणि शिक्षक संख्येच्या प्रश्नाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे.
या विद्यालयातून डेलिया मंगलमूर्ती सयाम या विद्यार्थिनीने ९३.२० टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला. धनश्री योगराज बिसेन या विद्यार्थिनीने ९१.८० गुण घेत दुसरा, तेजस विजय मते या विद्यार्थ्याने ९१.४० टक्के गुण घेत तृतीय तर रत्नाकर हर्षवर्धन तागडे याने ९१ टक्के गुण संपादन करीत चौथा क्रमांक पटकाविला. उल्लेखनीय म्हणजे एकूण ४८ परीक्षार्थीपैकी ४७ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून शाळेची टक्केवारी ९८ एवढी राहिली. एकूण परीक्षार्थ्यांपैकी ४ विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा अधिक, ८० टक्केच्या वर १८ विद्यार्थी, ७० टक्केच्या वर ९ विद्यार्थी, ६० चक्केच्या वर १० विद्यार्थी आणि ५० टक्केच्या वर ३ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले.
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी बंद पडलेल्या शाळेला चांगले दिवस दाखविण्यासाठी परिश्रम घेतले आणि अडगळीत पडलेल्या जिल्हा परिषदेच्या हायस्कूलला आज चांगले दिवस प्राप्त करून दिले. याचीच प्रचिती आज लागलेल्या दहावीच्या निकालातून दिसून येते. या निकालातून जिल्हा परिषद हायस्कूल पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली असून सर्व काही शक्य आहे, हे दाखवून दिले आहे. परिणामी, या शाळेला असलेल्या अपूऱ्या सोयीसुविधा आणि संसाधने मिळवून देण्यासाठी पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी विशेष लक्ष पुरविण्याची मागणी तालुक्यातून पुढे आली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन या क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे, पंचायत समितीच्या सभापती अंबिका बंजार, उपसभापती अनिल बिसेन, गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, शाळेचे मुख्याध्यापक मंगलमूर्ती सोयाम आणि सहकारी शिक्षक यांनी केले असून शाळेचे मुख्याध्यापक सोयाम आणि इतर शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापनाचे विशेष अभिनंदन करण्यात आले.