गोरेगाव,दि.०५ः- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेगावची कायापालट शासकिय निधीअभावी रखडली गेली होती,त्या निधीची वाट न बघताच शिक्षकांनी स्वखर्चाने सुंदर व उपक्रमशील अशी शाळा तयार केल्याने शिक्षकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.शाळेमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून शाळेतील सर्व वर्ग खोल्या व संपूर्ण शालेय परिसर मागील दीड वर्षापासून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणात ठेवला गेला आहे.तालुक्यातील पूर्णतः सीसीटीव्ही नियत्रंणात असलेली पहिली जिल्हा परिषद शाळा ठरली आहे.
शाळेतील संपूर्ण वर्ग खोल्या,वरांडे, आवार भिंत शैक्षणिक घटकाने सुशोभित करण्यात आलेले आहेत.आकर्षक व शैक्षणिक बोलक्या भिंतींचा प्रत्यक्ष अध्यापनात वापर व विद्यार्थ्यांसाठी स्वयंअध्ययन करण्यासाठी दर्जेदार साहित्य निर्मिती करण्यात आलेली आहे.शाळा 100% डिजिटल आहे.प्रत्यक्ष अध्यापनात डिजिटल साधनांचा प्रोजेक्टर,एलसीडी टीव्ही,डीटीएच,पेन ड्राईव्ह ,दीक्षा ॲपचा वापर करण्यात येतो. शाळेत दररोज नाविन्यपूर्ण दैनिक परिपाठ घेतला जातो ज्यामध्ये अठराच्या वर उपक्रमांचा समावेश करण्यात येतो. प्रत्येक विद्यार्थी बोलका करण्यासाठी परिपाठात विविध उपक्रम जसे बोधकथा,माय सेल्फ, माझा परिचय ,इंग्लिश कन्वर्सेशन ,सामान्य ज्ञान ,दिनांकाचा पाढा ,रोल कॉल, बातम्या, फाईव्ह लाईन्स यासारख्या अनेक उपक्रमांचा समावेश नियमितपणे करण्यात येते. प्रत्येक महिन्यात शंभर टक्के उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थिती बॅच व शैक्षणिक भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. शाळेत उपलब्ध वायफाय अटॅच झेरॉक्स मशीन द्वारे वर्कशीट व टेस्ट पेपर चा वापर करून गृहकार्य देण्यात येते.शाळेत राष्ट्रीय सण महापुरुषांच्या जयंती दप्तर मुक्त शनिवार पालक सभा स्वच्छता अभियान वृक्षारोपण इत्यादी उपक्रम नियमितपणे घेतले जातात.2024-25 या सत्रात चार विद्यार्थी कॉन्व्हेंट मधून शाळेत दाखल झालेले आहेत.शाळेला आमदार विजय रहांगडाले ,जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले ,प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी गोंदिया,गटशिक्षणाधिकारी गोरेगाव शिक्षण विस्तार अधिकारी यांनी भेट देऊन शाळेचे कौतुक केले आहे.केंद्रातील व परिसरातील विविध शाळांनी व्यवस्थापन समितीसह शाळेला भेट देऊन शाळेपासून प्रेरणा घेत आपल्या शाळेत येथील उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सुरु असून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याध्यापक घारपिंडे व शिक्षक देवेंद्र कुमार धपाडे सतत प्रयत्नशील असतात.