आता दहावीनंतरच डॉक्टर होता येणार! जाणून घ्या

0
215

वर्धा : सामाजिक जीवनात डॉक्टरला मिळणारा सन्मान पाहून अनेकांना डॉक्टर होण्याची इच्छा निर्माण होते. पण अवघड पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य नसल्याने मग आयुर्वेद किंवा अन्य परा वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतल्या जातो. असा नाईलाज प्रवेश घेण्यापेक्षा थेट दहावीतच प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचा मार्ग भारतीय वैद्य पद्धत राष्ट्रीय आयोगाने उपलब्ध करून दिला आहे.

दहावीनंतर आयुर्वेदिक डॉक्टर होता येईल. बीएएमएस हीच पदवी मिळणार. हा अभ्यासक्रम साडेसात वर्षाचा राहणार आहे. याबाबत गतवर्षी नियम तयार करण्यात आले. त्यावर आलेल्या आक्षेप, सूचना यांचा विचार करून अंतिम स्वरूपात अभ्यासक्रम निश्चित झाला असून तशी अधिसूचना आता प्रसिद्ध झाली आहे. प्रि आयुर्वेद प्रोग्राम फॉर आयुर्वेद मेडिसिन अँड सर्जरी रेगुलेशन ‘ असे नामकरण झाले आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यात प्रवेश घेता येईल.साडे सात वर्षाचा अभ्यास पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त होणार आहे.

पहिली दोन वर्ष प्रि आयुर्वेद प्रोग्राम असेल. साडेचार वर्ष बीएएमएस पदवी अभ्यासक्रम राहणार. परीक्षा देण्यासाठी ७५ टक्के हजेरी अनिवार्य असून प्रत्येक विषयाच्या तासिकेत देखील ७५ टक्के हजेरीची सक्ती राहणार. वर्षाच्या अखेरीस वार्षिक परीक्षा होणार. किमान ५० टक्के गुण मिळण्याची सक्ती आहे. भारतीय वैद्य पद्धत अंतर्गत आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी पदवी अभ्यासक्रमासाठी नीट प्रवेश घ्यावा लागतो.

मात्र या आयुर्वेद पूर्व अभ्यासक्रमासाठी नीट पीएपी द्यावी लागणार. त्यासाठी ठराविक गुणांची अट राहणार. पोटे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम भूतडा म्हणाले की यासाठी बहुदा स्वतंत्र महाविद्यालय सूरू होतील. मात्र सरसकट परवानगी दिल्या जाणार नाही. ज्याला खरंच आयुर्वेदात ओढ आहे, या पारंपरिक वैद्यक शास्त्रात पारंगत व्हायचे आहे, त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम उत्तम मार्ग ठरतो.एमबीबीएसला प्रवेश मिळू शकला नाही म्हणून नंतर आयुर्वेद पदवी घेण्याऐवजी हा एक मार्ग ठरू शकतो. पूर्वी १९७७ मध्ये ही सोय होती. मी त्याच दहावी पातळीवर आयुर्वेद पदवी घेतली. नंतर ती सोय बंद झाली. प्रारंभी काही राज्यातच हा अभ्यासक्रम सूरू होणार असल्याची माहिती आहे.सामायिक प्रवेश परीक्षेत एमबीबीएसची जागा मिळाली नाही तर इतर भारतीय वैद्यक उपचार पद्धतीच्या पदवीकडे जाणाऱ्यांची संख्या कर्नाटक सारख्या राज्यात वाढत चालल्याचे म्हटल्या जाते.