अर्जुनी मोरगाव– तालुक्यात सुरु असलेल्या केंंद्रस्तरीय अटल क्रीडा व साँस्कृतिक महोत्सवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंजोरीने विविध गटात सहा पुरस्कार प्रथम क्रमांकाचे पटकावत स्पर्धेवर आपले नाव कोरले.जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर,माजी सरपंच रवींद्र खोटेले,मोरेश्वर मेश्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक वर्ग व समस्त नागरिक यांच्या मार्गदर्शनात मुख्या. विठोबा रोकडे व सहायक शिक्षक लाखेश्वर लंजे यांच्या विशेष प्रयत्नाने खेळाडू विद्यार्थ्यांनी शाळेला हे यश प्राप्त करुन दिले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या बाक्टी केंद्रस्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात या शाळेने मागील वर्षीची परंपरा कायम राखीत विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. या शाळेने समुहनृत्य, समूहगीत गायन, नाटिका, एकल गीत गायन या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. या सांस्कृतीक कार्यक्रमांना संजय परशुरामकर व नृपराज भेंडारकर यांनी दिलेली साथ विशेष मोलाची ठरली. येथील विद्यार्थ्यांच्या गटाने आपल्या ज्ञानाची व समय सुचकतेची चुणूक दाखवत प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. बुद्धिबळ मुली या गटात कु. दिव्या कोरे हिने प्रथम क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल तालुक्यातील सर्वच स्तरातून खूप कौतुक होत आहे.