पीएचडीसाठीची गोंडवाना विद्यापीठाची जाचक अधिसूचना रद्द

0
22

चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठातील पीएचडी सेलने लागू केलेल्या जाचक अधिसूचनांमुळे विद्यार्थी चांगलेच त्रासले होते. हा विषय कुलगुरू, पीएचडी सेल प्रमुख यांच्याकडे सातत्याने मांडण्यात आला. शेवटी १ जानेवारी रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाव्दारे आचार्य पदवीकरीता निर्गमित होणारे अधिनियम, अधिसूचना जशाच्या तशा गोंडवाना विद्यापीठाने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे असे परिपत्रक गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाव्दारे काढण्यात आले आहे.

गोंडवाना विद्यापीठातील पीएच.डी. सेल मधील संशोधक विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या होत्या. अनेक जाचक अधिसूचना संशोधक विद्यार्थ्यांकरिता काढलेल्या होत्या. याचा त्रास पीएच.डी. करताना चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील संशोधक विद्यार्थ्यांना होत होता. या विरोधात संशोधक विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला या समस्यांबाबत १ नोव्हेंबर २०२३ ला प्रथम निवेदन दिले. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२३ ला कुलगुरू डॉ. प्रशांत बोखारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, मानव्यविज्ञा शाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली यांच्या समवेत नुटाच्या कार्यकारिणी सदस्य तथा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. प्रवीण जोगी, सिनेट सदस्य डॉ. दिलीप चौधरी, डॉ. सतीश कन्नाके, डॉ. मिलिंद भगत, डॉ. विवेक गोरलावार, डॉ. नरवाडे, निलेश बेलखेडे तथा संशोधक विद्यार्थ्यांची बैठक झाली. या बैठकीत संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्या तोंडी स्वरूपात मान्य करण्यात येवून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिनियम व अधिसूचना नुसारच पीएचडी प्रक्रिया राबविण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र बैठकीतील मंजूर मागण्याबाबत विद्यापीठाने कोणतेच परिपत्रक काढले नाही. या विषयाचा पाठपुरावा सातत्याने नुटाचे माध्यमातून सुरू होता. दरम्यान शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी कुलगुरू सोबत बैठक व चर्चा घडून आली. अखेर नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी रोजी याबाबत विद्यापीठाने परिपत्रक काढले व गोंडवाना विद्यापीठाने यूजीसीच्या पलीकडे लावलेले संशोधना संदर्भातील आगाऊ नियम रद्द करून यूजीसीने पीएचडी साठी जारी केलेले सर्व नियम जसेच्या तसे लागू करण्याचा निर्णय घेतला.
या संपूर्ण लढ्यात प्रा. डॉ. प्रवीण जोगी संशोधक विद्यार्थी रविकांत वरारकर, मोहित सावे, ए.एन. बर्डे, महेश यार्दी, अमोल कुटेमाटे, राहुल लभाने, सुनील चिकटे, सोहम कोल्हे, जगदीश चिमुरकर, नाहिद एन. हुसेन, संतोष कावरे, अमर बलकी, किशोर महाजन, विठ्ठल चौधरी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.