गोरेगाव,दि.०३– पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत दिनांक 2 व 3 जानेवारी 2025 रोजी आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत पीएम श्री जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा हिरडामाली येथे इयत्ता 8 वीत शिकणाऱ्या हिमांशु विजय कटरे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
हिमांशु विजय कटरे या विद्यार्थ्याने विज्ञान शिक्षक सुभाष सोनवाने यांच्या मार्गदर्शनात शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांतर्गत कचरा व्यवस्थापन ह्या उपविषयान्वये, जलाशयातील प्लास्टिकच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे हा विषय निवडला होता. यासाठी त्याने पाण्यातील प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यासाठी स्वयंचलित यंत्र बनविले. व गोळा झालेला कचरा पुनर्प्रक्रिया संयत्रात पाठवून प्लास्टिकचा पुनर्वापर करून जलाशयाचे व पर्यायाने निसर्गाचे सौंदर्य अबादित राखणे व संवर्धन करण्याचा संदेश दिला.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन रामकृष्ण विद्यालय कुऱ्हाडी पंचायत समिती गोरेगाव येथे करण्यात आले होते. विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेशभाऊ कुंभलकार व शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र शहारे, व शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी व सर्व पालकांनी हिमांशु विजय कटरे व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक सुभाष सोनवाने सर यांचे अभिनंदन केले.