गोरेगाव –तालुक्यातील हिरापूर ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या साईटोला येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण स्लॅबचे प्लास्टर कोसळून तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवार 2 जानेवारी रोजी घडली. या घटनेमुळे पालकांमध्ये संताप व्यक्त करत शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र, याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने आज, शुक्रवार (ता.3) जखमी विद्यार्थ्यांचे पालक व गावकऱ्यांनी त्या शाळेच्या जीर्ण इमारतील कुलूप ठोकले आहे. तर जोपर्यंत इमारत दुरुस्त होणार नाही व नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठविला जाणार नाही, तोपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेच्या पटांगणात मंडप टाकून शिक्षण देऊ अशी भूमिका पालकांनी घेतली आहे.तर दुसरीकडे घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाधिकारीव जि प सदस्यांना घेऊन सहलीला निघाले.
साईटोला येथे १ ते ४ पर्यंतची जिल्हा परिषद शाळा असून मुले व मुली असे 16 विद्यार्थी अध्ययनरत आहेत. दरम्यान, सर्व विद्यार्थी शाळेच्या एका इमारती बसतात. मात्र हि इमारतही जीर्ण झाली आहे. अशातच काल, गुरुवारी विद्यार्थी वर्गात असताना अचानक स्लॅबचा प्लास्टर काही विद्यार्थ्यांच्या अंगावर पडले. ज्यामध्ये तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी लखन रहांगडाले या विद्यार्थ्याच्या डोक्याला व हाताला दुखापत होऊन जखमी झाला तर चेतन कावळे व महेन सोनवाने हे दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते.
त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त करून आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नाही असा निर्णय घेतला होता. दरम्यान, आज, चार वर्ग असून केवळ एकच इमारत कामी आहे व तीही इमारत जीर्ण असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेच्या पटांगणातच बसवून शिक्षण देण्याच्या निर्णय घेतला आहे. तर जोपर्यंत इमारत पूर्णतः दुरुस्त होणार नाही तोपर्यंत पाल्यांना त्या इमारतीत बसवू देणार नाही अशी भूमिका घेत पालक व गावकऱ्यांनी शाळेला कुलूप लावत संताप व्यक्त केला आहे.