*गोंदियात सावित्रीमाईंची जयंती थाटात*
*रमाई माऊली नाटिकेने प्रेक्षक मंत्रमुग्ध*
गोंदिया ता. 3 जानेवारी :-19 व्या शतकात एका अविद्येने आमचं अनर्थ केलं. याची जाणीव ठेवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षणाचा दर्जा संविधानातून मिळवून दिला, तेव्हा महिला भगिनींनो आतातरी पुरोगामी विचारवंत व्हा असे कडकडीचे आवाहन नागपूरच्या फुले शाहू आंबेडकरी विचारवंत प्रा. माधुरी गायधनी (दुपटे ) यांनी केलं. येथील नवीन प्रशासकीय इमारती समोर आयोजित क्रांतीज्योती सावित्रीमायी फुले यांच्या 194 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या अध्यक्ष पदावरून बोलत होत्या. मंचावर कार्यक्रमाच्या उदघाटक शुभांगी घाटोळे, मुख्य वक्ता स्मिता गोविंद पानसरे आणि मुंबईच्या पोलीस निरीक्षक ममता नंदागवळी उपस्थित होत्या.
पुढे बोलताना प्रा. गायधनी म्हणाल्या की आम्ही शिकलो, इंजिनिअर, डॉक्टर, कलेक्टर झालो, आमचं शिकणे, नटणे हे सर्व माता सवित्रिमूळे मिळालं परंतु आज 3 जानेवारी क्रांतीज्योतीच्या जयंतीची आंबेडकरी महिलांशिवाय इतर महिलांना काहीही माहिती नाही यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
महिलांची भूमिका विशद करताना प्रा. गायधनी म्हणाल्या माता जिजाऊने शिवाजी महाराजांना छत्रपती केलं परंतु आताच्या काळात समाजाचं वातावरण बिघडलं आहे, हाथरस सारख्या घटना घडत आहेत. मुलींनी स्वतःच्या पायावर उभं झालं पाहिजे कारण आई शिकली तर कुटुंब शिकतं, समाज शिकतो आणि देश संस्कारीत होतं. मेंदू सुदृढ असलं तर पुरोगामी विचार रुजतील यामुळे आपला समाज आणि देश पुरोगामी होईल. ज्या भिडेवाड्यातून शिक्षणाची दारं उघडली त्या भिडेवाड्याची दारुण स्थिती आहे. आमच्या हक्काच्या शाळा बंद पडत आहेत. आम्ही सावित्री भीमाच्या लेकी आहोत, सामाजिक जीवनाची जाण ठेवून महिलांच्या शिक्षणाचा सन्मान करा, *पोरी जरा जपून, हेच नाहीतर, पोरा जरा जपून हेही विचार समाजात रुजविण्याची गरज आहे* असा सल्ला त्यांनी दिला. या प्रसंगी बोलताना श्रीमती पानसरे यांनी चार्वाक यांच्या पत्नीचे उदाहरण स्पष्ट करून,बहुमत हे निर्णायक असतं असं नाही यावर त्यांनी युक्तिवाद केला.
याप्रसंगी उदघाटक श्रीमती घाटोळे आणि पोलीस निरीक्षक नंदागवळी यांनीही विचार मांडले. याप्रसंगी संथागार महिला विंगच्या महिलांनी सादर केलेली *सूर्याची सावली – रमाई माऊली* ही नाटिका पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समन्वयक पदाधिकाऱ्यांचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुछ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम क्रांतीज्योती सवित्रीमाई फुले फॉलोअर्स महिला संघटनाच्या वतीने आयोजित केला.
माता सवित्रीआई फुल्यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक समता गणवीर यांनी, संचालन सविता उके यांनी तर आभार श्रीमती फुले यांनी मानले.