भंडारा, दि 18: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या दहावी, बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने कंबर कसली असून त्यासाठीची तयारी बोर्डाकडून सुरू आहे. यंदा १५ दिवस आधीच परीक्षा होणार असल्याने माध्यमिक शिक्षण विभागानेही तयारी सुरू केली आहे. यावर्षी जिल्ह्यात दहावीचे ८७ तर बारावीचे ६४ परीक्षा केंद्र राहणार आहेत.
यंदा बारावीच्या लेखी परीक्षा ११ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशपूर्व परीक्षांची तयारी करता यावी आणि वेळेत निकाल लागून प्रवेश घेणे सुलभ व्हावे यासाठी यंदा लवकर परीक्षा होत आहेत. याबरोबरच परीक्षा कॉपीमुक्त आणि कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी भौतिक सुविधांसह सर्व शाळांमध्ये कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे. शालांत परिक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व केंद्रांची निश्चिती झाली असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने सांगितले आहे. तसेच यंदा माध्यमिक शिक्षण विभागाकडूनही केंद्रांवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी वॉररूम तयार करण्याच्या सूचना विभागीय मंडळाने माध्यमिक शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
■ अतिरिक्त गुण प्रस्तावासाठी मुदतवाढ
दहावीच्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला याबाबतच्या अतिरिक्त गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी शाळांकडे प्रस्ताव सादर करण्यास १५ डिसेंबर तर शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यास १५ जानेवारीपर्यंत मुदत होती. मात्र, सरकारी रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षांचा निकाल चालू महिन्यात लवकरच जाहीर व्हावयाचा आहे. त्यामुळे शाळांकडे प्रस्ताव सादर करण्यास २४ जानेवारी तर शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
■ इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा २०२५ कॉपीमुक्त, भयमुक्त आणि पारदर्शक पद्धतीने घेण्या करीता मा. जिल्हाधिकारी भंडारा यांचे मार्गदर्शनात जबाबदारी पार पाडली जाणार आहे. कॉपीमुक्त परीक्षा संबंधाने जनजागृती करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. १६ जानेवारीला नवोदय विद्यालय पाचगाव ता. मोहाडी येथे सर्व गटशिक्षणाधिकारी व परिरक्षक यांची सभा घेऊन आवश्यक सुचना दिल्या आहेत.
– रवींद्र सलामे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, भंडारा
■ कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह
जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह सोमवार, दिनांक २० जानेवारी २०२५ ते रविवार , २६ जानेवारी २०२५ पर्यंत राबविण्यात येत आहे.
दिवस व दिनांक करावयाच्या कार्यवाहीचा तपशील
सोमवारी, दि. २० – स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा विकास व व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक व
प्राचार्य, शिक्षक यांना संयुक्त सभेमध्ये कॉपीमुक्त अभियानाची शाळा पातळीवर
अंमलबजावणी करणेबाबत माहिती देणे.
मंगळवार, दि. २१ – कॉपीमुक्त अभियानाची शपथ सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये परिपाठाचे वेळी घेणे.
बुधवार, दि. २२ – शाळा स्तरावर मंडळ शिक्षासूचीचे वाचन करणे,गैरमार्ग केल्यास होणाऱ्या परिणामांची
जाणीव करून देणे.
गुरूवार, दि. २३ – परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहार व आरोग्याची काळजी याबाबत तज्ज्ञांमार्फत
शाळा/कनिष्ठ महाविद्यालयमध्ये पालक व विद्यार्थ्यांना उद्बोधन करणे.
शुकवार, दि. २४ – परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाची तयारी, उत्तरपत्रिका कशा प्रकारे लिहाव्यात याबाबत
तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करणे. तसेच राज्य मंडळामार्फत तयार केलेली चित्रफीत
विद्यार्थ्यांना दाखविणे
शनिवार , दि. २५ – कॉपीमुक्त अभियानाच्या जागृतीसाठी कॉपीमुक्ती घोषवाक्यासह शाळा परिसरात
जनजागृती फेरी काढणे.
रविवार, दि. २६- ग्रामसभा बैठकीमध्ये मुख्याध्यापक/शिक्षक यांनी कॉपीमुक्त अभियानासंदर्भात वरील
विषयांबाबत माहिती देणे व याबाबत जनजागृती करणे व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा
पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करणे.