-विद्यापीठात बौद्धिक संपदा अधिकार राष्ट्रीय कार्यशाळा
नागपूर :संशोधन ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माननीय प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा संशोधन व विकास कक्ष (आरडीसी), पदव्युत्तर शैक्षणिक विधी विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) आणि बौद्धिक संपदा अधिकार कक्ष (आयपीआर) यांच्या संयुक्त विद्यमाने सातवी राष्ट्रीय बौद्धिक संपदा कार्यशाळा श्रीनिवास रामानुजन सभागृह येथे सोमवार, दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. काकडे बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्र-कुलगुरु डॉ. राजेंद्र काकडे यांनी भूषविले, प्रमुख वक्ते म्हणून पेटंट व डिझाईन आरजीएनआयआयपीएम नागपूरचे सहनियंत्रक श्री निर्माल्य सिन्हा, विद्यापीठ आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, पदव्युत्तर विधी विभाग प्रमुख डॉ. पायल ठावरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. भारतीय ज्ञान परंपरा फार प्राचीन असून आपणाकडे ज्ञानाचे भंडार असले तरी आपण त्याचे सुरक्षित जतन करू शकलो नाही असे पुढे बोलताना डॉ. काकडे यांनी सांगितले. संशोधन हे राष्ट्राची संपत्ती असल्याने वाणिज्य दृष्टीने संवर्धन करीत जतन करणे गरजेचे आहे. समाजाच्या गरजा लक्षात घेता संशोधन करण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे. सामाजिक गरजांनुसार संशोधन झाल्यास त्याचा व्यावसायिक उपयोग होत त्यापासून रॉयल्टी देखील प्राप्त होईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP2020) मध्ये देखील नाविन्यपूर्ण संकल्पनांवर भर देण्यात आला आहे. एनईपीनुसार विद्यार्थ्यांना त्याचे क्रेडिट देखील मिळणार असल्याचे डॉ. काकडे यांनी सांगितले. नवकल्पना, आर्थिक वाढ, पारंपारिक ज्ञानाचे संरक्षण आणि जागतिक स्पर्धात्मकतेसाठी बौद्धिक संपदा संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. पेटंट्स आणि औद्योगिक डिझाईन्सच्या महत्त्वावर त्यांनी प्रकाश टाकला. सर्जनशील कल्पना सुरक्षित राहत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकते. विद्यार्थी व विद्यापीठासाठी याचे फायदे त्यांनी सांगितले.
श्री निर्माल्य सिन्हा यांनी आपल्या भाषणात भारतातील बौद्धिक संपदा अधिकारांच्या कायदेशीर चौकटीबाबत सखोल माहिती दिली. सहभागींना पेटंट्स आणि औद्योगिक डिझाईन्सचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना संशोधन आणि व्यवसाय संधींना चालना मिळू शकते. विधी विभाग प्रमुख डॉ पायल ठावरे यांनी कार्यशाळेचा उद्देश, महत्त्व आणि मुख्य लक्ष केंद्रित करणारे क्षेत्र सांगितले. पदव्युत्तर विधी विभाग मागील सात वर्षांपासून बौद्धिक संपदा अधिकाराच्या जागरूकतेसाठी या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करीत असल्याची माहिती डॉ. ठावरे यांनी दिली. विद्यार्थ्यांना पेटंट सादर करणे आणि औद्योगिक संकल्पचित्र संरक्षण करण्याबाबत प्रत्यक्ष कौशल्य प्रदान करता यावे. यामुळे या कार्यशाळेचे आयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. स्वागत भाषण डॉ. स्मिता आचार्य यांनी केले. कार्यशाळा १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत तज्ञांचे व्याख्याने, प्रात्यक्षिक सत्रे आणि केसस्टडी चर्चा होणार आहेत. या सत्रात पेटंट फाइलिंग प्रक्रिया, कॉपीराइट नोंदणी, औद्योगिक डिझाईन्स आणि ट्रेडमार्क्सचे सारांश, पेटंट वाणिज्यिकीकरण आणि उल्लंघन मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. डॉ. स्मिता आचार्य व डॉ. पायल ठावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे समन्वयन श्री. आबिद खान आणि सौ. अनुश्री मुक्ते यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन शिखा गुप्ता यांनी केले तर आभार डॉ. विजयता उईके यांनी मानले.