गोंदिया, दि.13 : अनुसूचित जातीसह, विमुक्त भटक्या, अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेती कामगार आणि पारंपारिक कारागीर श्रेणीतील कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती भरण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर असून जिल्ह्यातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
वर्ष 2025-26 करिता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले असून याबाबतची सविस्तर माहिती www.nosmsje.gov.in या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीची केंद्रीय क्षेत्र योजना अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेती कामगार आणि पारंपारिक कारागीर श्रेणीतील कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेऊन पदव्युत्तर पदवी किंवा पीएच.डी. अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण घेण्यास मदत करण्यासाठी आहे. याअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 115 जागा, विमुक्त भटक्या आणि अर्ध भटक्या विमुक्तांसाठी 6, भूमिहीन शेतकऱ्यांसाठी आणि पारंपारिक कारागिरांसाठी 4 अशा एकूण 125 विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल
पात्रतेचे निकष : विद्यार्थी निर्धारित केलेल्या घटक प्रवर्गातील असावा. विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा. पस्तीस वर्षापेक्षा अधिक वय नसावे, कुठल्याही वर्षाच्या एक एप्रिल पासून वय निश्चित केले जाईल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ६० % गुण असणे आवश्यक. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत (QS World University Rank) ५०० च्या आत असावी.
लाभाचे स्वरुप : विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण फीची पूर्ण रक्कम (अ)आरोग्य विमा (Health Insurance) आणि (ब) व्हिसा शुल्क (Visa Fees) या बाबी परदेश शिष्यवृत्तीधारकांसाठी अनुज्ञेय असतील. विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी यु.एस.डॉलर (USD) १५,४०० तर यु.के.साठी जी.बी. पौंड (GBP) ९,९०० इतका अदा करण्यात येतो. विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यु.एस.ए. व इतर देशांसाठी यु.एस. डॉलर (USD) १,५०० तर यु.के.साठी जी.बी. पौंड (GBP) १,१०० इतके देण्यात येतात. यामध्ये पुस्तके, अभ्यासदौरा व इतर खर्चाचा समावेश आहे. विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च अनुज्ञेय असेल.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी थेट दिल्ली केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधता येईल. योगेश तनेजा, अवर सचिव, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, नवी दिल्ली -110001
Phone : 011 23384023 (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी तीन वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत वरील मोबाईल क्रमांकावर फोन करून बोलता येईल). अथवा Email : so-nos-msje[at]gov[dot]in या ई-मेल आयडीवरही संपर्क करता येईल. यासह अन्य कोणत्याही तांत्रिक माहितीसाठी dev2-nha[at]supportgov[dot]in या मेलवरही संपर्क साधता येईल. विद्यार्थ्यांना इतर काही अडचणी असल्यास त्यांनी www.nosmsje.gov.in केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर भेट देऊन सतरा पानांची पीडीएफ पहावी. https://nosmsje.gov.in/nosmsje/public/images/Scheme-guidelines-२०२५-२६.pdf गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांनी केले आहे.





