गोंदिया,दि.३०ः गोरेगाव येथील शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर लोंढे यांच्या कार्यप्रणालीवर ठपका ठेवत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आज मंगळवारी (ता. ३०) सकाळी नऊ वाजेपासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांनी मुख्याध्यापकाची ताबडतोब बदली करण्यात यावी, अशी मागणी केली.
विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी नऊ वाजेपासून ठिय्या आंदोलनाला सुरवात केली. मुख्याध्यापक प्रभाकर लोंढे यांची इतरत्र बदली करण्यात यावी, अशी मागणी रेटून धरली. इतकेच नव्हे, तर मुख्याध्यापक प्रभाकर लोंढे यांच्याविरोधात घोषणा देत मागणी पूर्ण झालीच पाहिजे, अन्यथा विद्यार्थी व पालक शाळेत पाऊलही ठेवणार नाही. अशा घोषणा देण्यात आल्या. तथापि, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरगानंथम यांच्यासह शाळा व्यवस्थापन व जिल्हा परिषद सदस्य शैलेष नंदेश्वर, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, तहसीलदार प्रज्ञा भोकरे, गटविकास अधिकारी हेमराज गौतम, गटशिक्षणाधिकारी एम.डी. पारधी, जिल्हा परिषद सभापती डाॅ.लक्ष्मण भगत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी आंदोलनस्थळी धाव घेत बंद दाराआड बैठकीत विद्यार्थ्यांच्या तक्रारी, पालकांचे आरोप यावर चर्चा केली. या बैठकीनंतर मुख्याध्यापक लोंढे यांना मुख्याध्यापक पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, लोंढे हे शिक्षक म्हणून कार्यरत राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मुख्याध्यापक लोंढे यांच्या कार्यकाळातील सर्व कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दिल्याने उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले.





