40.6 C
Gondiā
Monday, June 15, 2026
Home शैक्षणिक पदोन्नतीमध्ये सेवाजेष्ठ शिक्षकांना डावलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पदोन्नतीमध्ये सेवाजेष्ठ शिक्षकांना डावलल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

0
38

blank

जिल्हा परिषद गोंदिया येथील टीईटी/सीटीईटीधारक सेवाजेष्ठ शिक्षकांचा इशारा
गोंदिया,दि.१५: जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत सुरू असलेल्या शिक्षक पदोन्नती प्रक्रियेत सेवाजेष्ठ व टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण शिक्षकांना डावलण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा टीईटी/सीटीईटीधारक शिक्षक तसेच जिल्ह्यातील सर्व सेवाजेष्ठ शिक्षकांनी दिला आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम, १९६७ तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा सन्मान राखून पदोन्नतीसाठी सेवा जेष्ठ शिक्षकांनी कठोर परिश्रम करून १/९/२०२५ नंतर टीईटी/ सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे असे असताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पूर्वी म्हणजे १/९/२०२५पूर्वी टीईटी/सिटीईटी पात्रता धारण करणाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावे या संचालकच्या पत्रकामुळे संपूर्ण राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीमध्ये घोळ निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम तसेच प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्याची पदोन्नती प्रक्रिया सुरू झालेल्या दिनांकास टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असलेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांना पदोन्नतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका शिक्षकांनी मांडली आहे.

शिक्षकांच्या मते, सेवाजेष्ठता व आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकांना न्याय मिळाला नाही तर जिल्हा परिषद गोंदिया कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. शासन व प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून पात्र शिक्षकांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.पदोन्नती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखून पात्र व सेवाजेष्ठ शिक्षकांना न्याय देण्यात यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकही सक्रिय सहभाग घेतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.