महाविद्यालये घेणार 50 टक्के परीक्षा

0
8

नागपूर,दि.30 – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यानंतर विद्यापीठावरील परीक्षेचा भार कमी करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयांनी 50 टक्के परीक्षा घेण्याचा “फिफ्टी-फिफ्टी’ हा फॉर्म्यूला डॉ. सि. प. काणे मांडला. तब्बल अकरा महिन्यांनंतर त्यांच्या फॉर्म्युल्याला बुधवारी (दि. 28) विद्वत परिषदेने मान्यता दिली. पुढल्या वर्षापासून महाविद्यालयांना पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम, तृतीय आणि चतुर्थ सेमिस्टरच्या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांना सेमिस्टर पॅटर्न लागू करण्यात आले. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये दुपटीने वाढ झाली. हिवाळी आणि उन्हाळी परीक्षांच्या बोझाखाली विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या विकासात्मक उपक्रमांना खिळ बसल्याचे चिन्ह दिसून आले. त्यामुळे परीक्षांच्या बोझा कमी करण्यासाठी कुलगुरूंनी महाविद्यालय आणि विद्यापीठाने “फिफ्टी-फिफ्टी’ परीक्षा घेण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी सादर केला. मात्र, त्यात केवळ “ऑनलाइन’ शब्द असल्याने हा प्रस्ताव तत्कालीन विद्वत परिषदेने बारगळला. मात्र, या प्रस्तावाचा पाठपुरावा करीत बुधवारी त्यात सुधारणा करून नव्याने प्रस्ताव सादर करीत त्यास मान्यता देण्यात आली. द्वितीय, पाचवे आणि सहाव्या सेमिस्टरचे पेपर विद्यापीठ स्तरावर होईल. परीक्षेसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाद्वारे उत्तरपत्रिका पाठविण्यात येतील. पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरमधील गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येईल. प्रात्यक्षिकातही बराच बदल करण्यात आला असून केवळ वर्षाच्या शेवटीच ते महाविद्यालयांना घ्यावे लागतील. मात्र, या निर्णयातून विधी, अभियांत्रिकी, बीएड आणि औषधनिर्माण हे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे निर्णयाला प्राचार्य फोरमचा पाठिंबा असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी दिली.