नागझिऱ्यातून दोन वर्षांत चार वाघांचे स्थलांतर

0
7

गोंदिया-नागझिरा अभयारण्यात शिकाऱ्यांचा झालेला शिरकाव, मानवांचा हस्तक्षेप तसेच पुरेशे अन्न उपलब्ध नसल्यामुळे मागील दोन वर्षांत नागझिरातील चार वाघ इतरत्र स्थलांतरित झाले असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे नागझिरा अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे़

सन २०१३च्या फेब्रुवारीमध्ये नागझिरा अभयारण्यातील ‘अयात’ नावाचा वाघ वाराशिवनीच्या पेंच प्रकल्पाच्या जंगलात निघून गेला. त्यानंतर आॅगस्ट २०१३मध्ये ‘जय’ नावाचा वाघ उमरेडच्या करंडला येथे निघून गेला, तर २०१४मध्ये ‘प्रिंस’ नावाचा वाघ पेंच येथे निघून गेला. यापाठोपाठ २१ नोव्हेंबर रोजी ‘अल्फा’ या वाघिणीच्या पोटी जन्मलेली ‘कॉनी’ ही वाघीण नागझिरातून निघून गेली. तिची शोधमोहीम मागील दीड महिन्यापासून सुरू होती. ‘कॉनी’चा ठावठिकाणा शोधण्यासाठी नागझिरा, नवेगाव व कोका परिसरातील ट्रॅपिंग कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी नजर ठेवून होते. अखेर ती नवेगाव अभयारण्यात आढळली. ३ डिसेंबर रोजी ‘कॉनी’ नवेगाव येथील बोंडे रेंजमधील कॅमेऱ्यात कैद झाली. नागझिरानंतर पूर्वेकडील भाग शेंडा, कोयलारी व डोंगरगाव परिसरात काही दिवस घालवून ती डिसेंबरमध्ये नवेगाव अभयारण्यात पोहोचली. नागझिरा ते नवेगाव या प्रवासात या वाघिणीने ६९ किलोमीटरचे अंतर पार केले.