भंडारा पालिका शाळेत मिळणार इंग्रजीचे धडे

0
15

भंडारा,दि.11 : एकेकाळी दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरातील नगर पालिका शाळांना अवकळा आली होती. परंतु अलिकडेच पालिकेवर भाजपची सत्ता येताच तरूणतुर्क नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी इंग्रजी माध्यमाचे कॉन्व्हेंट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

भंडारा शहरातील लहान मुला-मुलींना इंग्रजी विषयाचे ज्ञान नि:शुल्क मिळावे यासाठी नगर परिषदेने २०१७-१८ या सत्रापासून डॉ.जाकीर हुसैन उर्दु प्राथमिक शाळा पांडे महाल परिसर आणि शहीद भगतसिंग प्राथमिक शाळा नवीन टाकळी येथील शाळेत विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश देऊन केजी १ व केजी २ च्या अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. सन २०१७-१८ या सत्रापासून नगर परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्रजी माध्यमातून अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वितरीत करण्यात येणार आहे. केजी १ व केजी २ च्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलामुलींना प्रवेश दिला जाणार असून शालेय उपयोगी वस्तुंचा मोफत देण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष रूबी चढ्ढा, शिक्षण समिती सभापती जयश्री बोरकर यांनी सांगितले.

नगरपालिका शाळांसंदर्भात पालकांसह विद्यार्थ्यांची नेहमीच उदासिनता दिसून येते. मात्र त्यांची उदासिनता लक्षात घेऊन खासगी शाळांप्रमाणे पालिकेच्या शाळेत इंग्रजीचे धडे मिळावे यासाठी दोन शाळांची निवड करण्यात आली आहे. मोफत प्रवेश असल्यामुळे पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.