विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा

0
11

मुंबई-क्रिकेट विश्वाचा मानबिंदू असणाऱया विश्वचषक स्पर्धेसाठीच्या अंतिम पंधरा खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने मंगळवारी पंधरा सदस्यीय भारतीय संघातील खेळाडूंची नावे जाहीर केली. दर चार वर्षांनी रंगणाऱ्या या क्रिकेटच्या महासोहळ्यात भारतीय संघाकडून आपलाही सहभाग असावा अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. अंबाती रायुडू, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी, उमेश यादव, रोहित, रहाणे यांची विश्वचषक स्पर्धेच्या भारतीय संघात सदस्य होण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. तर, मुरली विजय, रॉबिन उथप्पा, अमित मिश्रा, कुलदीप यादव, मनोज तिवारी यांना मात्र संघात स्थान मिळवता आलेले नाही.
विशेष म्हणजे, रणजी स्पर्धेतील शानदार कामगिरी, अष्टपैलू रवींद्र जडेजाला झालेली दुखापत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव या मुद्दय़ांच्या बळावर युवराजचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले होते. परंतु, युवीचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे युवराजच्या निवडीसंदर्भात सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तर, जडेजाच्या दुखापती संदर्भात डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार तो दुखापतीतून सावरत असून जडेजा जवळपास फीट आहे. शिवाय पूर्णपणे फिट होण्यासाठी जडेजाजवळ एक महिन्याचा अवधी आहे. या पार्श्वभूमीवर निवड समितीने रविंद्र जडेजाचा अंतिम पंधरा जणांमध्ये समावेश केला आहे. विशेष म्हणजे, अष्टपैलूंच्याबाबतीत स्टुअर्ट बिन्नीचा विचार यावेळी निवड समितीने केला असून त्याचे तिकीट पक्के केले आहे. तसेच अंबाती रायुडूवर देखील निवड समितीने विश्वास दर्शवला आहे. गेल्या वर्षभरात अष्टपैलू कामगिरी करत छाप उमटवणाऱ्या अक्षर पटेलला अंतिम पंधरा खेळाडूत स्थान मिळाले आहे. प्रमुख फिरकीपटू म्हणून रवीचंद्रन अश्विनच्या नावाला पसंती दिली आहे.
गोलंदाजांना पोषक असणाऱया खेळपट्ट्यांवर विश्वचषक स्पर्धा होत असल्यामुळे सर्वोत्तम गोलंदाजांचा भरणा असण्यालाही महत्त्व देण्यात आले आहे. भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव यांच्यावर भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे.
विश्वचषक स्पर्धेसाठीचा अंतिम पंधरा खेळाडूंचा भारतीय संघ-
महेंद्रसिंग धोनी(कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अंबाती रायुडू, इशांत शर्मा, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी.
फक्त चारचौघे विश्वविजेते
मागील विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघातील कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सुरेश रैना आणि आर. अश्विन या चार खेळाडूंनी संभाव्य संघात स्थान मिळवले आहे, तर ११ खेळाडू यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात नाहीत. यापैकी सचिन तेंडुलकरने निवृत्ती पत्करलेली आहे, तर एस. श्रीशांतवर स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी बंदी घातलेली आहे. परंतु बाकीचे नऊ खेळाडू खराब कामगिरीमुळे संघात स्थान मिळवू शकलेले नाहीत. मागील विश्वचषक स्पध्रेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेला युवराज सिंगसुद्धा संघात स्थान मिळवू शकला नाही.