बालचित्रवाणी’ बंद; ‘ई बालभारती’स सुरू करणार

0
9

मुंबई,दि.31: पुण्यातील बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा जीआर काढला आहे.दैनंदिन खर्च भागवण्यासाठी रक्कम नसल्यामुळे आणि 50 पेक्षा कमी कर्मचारी असल्यामुळे ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला.इतकेच नाही तर आजच सर्व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.बालचित्रवाणीऐवजी आता ई- बालभारती ही नवी संस्था स्थापन करण्यात येणार आहेत.

बालचित्रवाणी ही संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत होती. संस्थेतील कर्मचाऱ्यांचे वेतन व दैनंदिन खर्च भागवण्यासाठी सुद्धा रक्कम शिल्लक नसायची. या संस्थेत 50 पेक्षा कमी कामगार असल्याने, आणि ही संस्था उद्योग या संज्ञेत येत असल्याने ती बंद करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना औद्योगिक कलह कायदा, 1947 नुसार एक महिन्याची आगावू नोटीस पे देण्यात येणार आहे. तसेच 31 मे 2017 पासून या कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात येणार आहे.

मागील काही वर्षांत बालचित्रवाणीची आर्थिक परिस्थिती खराब झाली होती. निधी अभावी कर्मचाऱ्यांचे महिनोमहिने वेतन न होणे, नवीन यंत्रणांचा अभाव, नवीन कार्यक्रमांची ठप्प झालेली निर्मिती यांमुळे बालचित्रवाणी बंद होणार, अशी चर्चा होती. तसेच शिक्षण विभागाची ही महत्त्वाची संस्था असल्याने शासन बालचित्रवाणी बंद होऊ देणार नाही अशी अपेक्षा बऱ्याच जणांना होती. शासनाच्या या निर्णयाने आता याला पूर्ण विराम मिळाला आहे.