समर्थ महाविद्यालयाच्या एम कॉम प्रथम वर्षाच्या 32 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान 

0
11

३२ विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेश पत्र मिळालेच नाही

समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील गैरप्रकार

लाखनी,दि.26ः- स्थानिक लाखनी येथील प्रसिद्ध समर्थ महाविद्यालय येथे काल पासून एम कॉम प्रथम वर्ष विद्यापीठ परीक्षा सुरु झाली. समर्थ महाविद्यालय लाखनी येथील ३२ विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षासाठी जून २०१७ ला प्रवेश घेतला. परंतु दि २५ ऑक्टोबर २०१७ ला प्रथम सेमिस्टर असतांना त्यांचे परीक्षा पत्रक महाविद्यालयातून प्राप्त न झाल्याने त्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. यामुळे विद्यार्थी आणि पालकांची चांगलीच धांदल उडाली आहे. या बाबद प्राचार्य पोहरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते महत्वाच्या बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाला विचारणा केले असता स्पष्टपणे कुणीही उत्तर देऊ शकले नाही. याबाबद  विद्यापीठ स्तरावर विचारणा केली असता, समर्थ महाविद्यालय लाखनीने एम कॉम पदवीच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाकडून अॅफिलेशन न घेतल्याने प्रवेश दिले गेले नसल्याचे सांगितले गेले. महाविद्यालय प्रशासनाद्वारे रीतसर परवानगी घेऊन विद्यार्थ्याना प्रवेश दिले असता तर ३२ विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले नसते. याउपरही महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांचे हित जपण्याचे कार्य आधी करणे गरजेचे होते. महाविद्यालय प्रशासन नेहमी वादातीत असून प्राध्यापक आणि कर्मचार्यांना त्रास देण्याचेही नेहमी ऐकायला मिळते. मागील वर्षी काही प्राध्यापकांनी प्राचार्यांच्या विरोधात त्यांच्या इनक्रीमेंट रोकून धरल्याच्या व त्यानंतर त्यांनी उपोषण केल्याच्या धक्कदायक बाबी येथे उघडकीस आलेल्या आहेत. त्यामुळे समर्थ महाविद्यालय हे जिल्ह्यातील सर्वात जुने व पहिले महाविद्यालय असतांना अशा प्रकारच्या विद्यार्थी व प्राध्यापकांना नुकसान देण्यार्या घटना घडत असल्याने शैक्षणिक वर्तुळात चुकीचा संदेश पसरत चाललेला आहे. यावर विद्यार्थी निराशाजनक झालेले असून समाजसेवक अविनाश ब्राह्मणकर आणि धनु व्यास यांच्याकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला त्यावर विद्यार्थांना न्याय मिळवून देण्याचा इशारा अविनाश ब्राह्मणकर यांनी दिला.

समर्थ महाविद्यालयातील एम कॉम प्रथम वर्ष विद्यार्थी कुलगुरू डॉ काणे यांना भेटण्यासाठी जाणार असून दाद मागणार आहेत. उदया दुसरा पेपर असून पेपर देण्यापासून वंचित राहणार आहेत. विद्यार्थांनी विनंती केली आहे की, किमान विद्यापीठाद्वारे काही नियम शिथिल करून ३२ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू द्यावे. अन्यथा आंदोलन करू असेही विद्यार्थी आणि विद्यार्थी नेते धनु व्यास यांनी केले आहे.

महाविद्यालयीन चुकीच्या प्रशासनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ते एम कॉम प्रथम वर्षा परीक्षेपासून वंचित राहिले त्यामुळे पूर्ण एक वर्ष वाया गेले. या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले जवळपास ८ ते ९ विद्यार्थी हे माझ्या सानगडी या गावातील होते. ३० किलोमीटर अंतराहून शिक्षण घेण्यासाठी येत होते आणि महाविद्यालय प्रशासनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल तर ही शिक्षण क्षेत्रासाठी कीव येणारी बाब आहे. महाविद्यालयातील प्राचार्यांनी महाविद्यालयात किती कोर्स आहेत आणि त्यांची परवानगी मिळाली आहे की, नाही याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर येण्यासाठी तयार असल्याची माहिती अविनाश ब्राह्मणकर यांनी दिली.

 

प्राचार्यांनी महाविद्यालयात किती अभ्यासक्रम चालविले जातात याकडे लक्ष देणे आवश्यक होते. तसेच परवानगी आल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देणे गरजेचे होते. महाविद्यालयाच्या अंतर्गत वादातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हे चुकीचे असून आम्ही विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी लढू आणि आम्ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही देत उद्या कुलगुरू डॉ काणे यांची भेट घेऊन सदर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी सिनेट सदस्य महेंद्र निंबार्ते यांनी सांगितले.