शेतकऱ्याला समृध्द करण्यासाठी प्रयत्नशील-सुभाष देशमुख

0
17

कामठा येथील शिवशंकर सहकारी धान गिरणीला भेट
गोंदिया,दि.२६ : जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. सहकार तत्वावरील ९ धान गिरण्या कार्यरत आहेत. हया धान गिरण्या जीर्णावस्थेत असून त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करुन जुन्या भात गिरण्यांना पुनरुज्जीवित करुन जिल्ह्यातील शेतकऱ्याला समृध्द करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. २६ ऑक्टोबर रोजी कामठा येथील श्री शिवशंकर सहकारी धान गिरणीला भेट दिली. त्यावेळी श्री.देशमुख बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री राजकुमार बडोले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपूरे, माजी आमदार हेमंत पटले, भैरसिंह नागपूरे, आमदार डॉ.अनिल बोंडे उपस्थित होते.
श्री.देशमुख पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करुन त्यांचे उत्पादन वाढले पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे यासाठी शासन कटिबध्द आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार क्षेत्र वाढले पाहिजे यासाठी सहकार विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांच्या सहकार्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
श्री.बडोले म्हणाले, पूर्व विदर्भातील गोंदिया हा धान उत्पादक जिल्हा आहे. यावर्षी जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे परिस्थिती नाजूक आहे. २५ टक्के शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली नाही. यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यात सहकारी संस्था आहेत परंतू त्यांच्याकडे स्वत:चे गोडावून नाही. यासाठी सहकारी संस्थांना गोडावून देण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ८२ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत, त्याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी मंत्री महोदयांनी कामठा येथील श्री शिवशंकर सहकारी धान गिरणीला भेट दिली. त्यानंतर गोंदिया शहरानजीकच्या पिंडकेपार येथील हरिओम मॉडर्न राईस मिलला देखील भेट दिली व न.प.गोंदिया मोक्षधाम येथे सुध्दा भेट देवून पाहणी केली व उपस्थितांशी चर्चा केली.
कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम, जि.प.सदस्य विजय लोणारे, सरपंच निलेश कुंभरे, धान गिरणीचे अध्यक्ष टिकाराम भाजीपाले, रेखलाल टेंभरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर सहकारी धान गिरणीचे उपाध्यक्ष मनोज दहीकर यांनी केले. कार्यक्रमाला कामठा परिसरातील धान उत्पादन शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.