२५७ शाळांची झाडाझडती

0
4

औरंगाबाद-नियमांना केराची टोपली दाखवित मनमानीला करणाऱ्या शाळांचा शिक्षण विभागाने फास आवळला आहे. शिक्षण विभागाने दोन दिवसात शहरातील २५७ शाळांची तपासणी केली. यापैकी अनेक शाळांमध्ये शुल्कवाढ, कँटीनची सक्ती केली जात असल्याचे लक्षात आले आहे. विभागातर्फे त्रुटीनिहाय शाळांची यादी सोमवारी जाहीर केली जाणार असून शासनाकडे कारवाईसाठी अहवाल दाखल केला जाणार आहे.

शिक्षण विभागाने १४८ पथके नेमून बुधवारीपासून तपासणीला सुरुवात केली आहे. या शाळांचे अहवाल आणि त्रुटी असलेल्या शाळांची यादी करण्याचे काम गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होते. ही यादी सोमवारपर्यंत जाहीर केली जाणार आहे. तपासणी करण्यात आलेल्या शाळांपैकी अनेक शाळांमध्ये सुविधांची वाणवा, तर आहेच; त्यासोबत सर्वाधिक अतिरिक्त शुल्कवाढ झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. शाळांची ही मनमानी पाहता तपासणी पथकेही चक्रावली आहेत. अनेक शाळांमध्ये कँटीन सक्ती, मान्यता न घेणे, संचमान्यता नसणे, क्रीडागंण नसणे आदी त्रुटी आहेत. बहुतांश शाळांनी पालक-शिक्षक संघ केवळ कागदापुरतेच तयार केले आहेत. शिक्षण विभागाच्या तपासणीत अशा शाळांचे पितळ उघडे पडले आहे.

तपासणीनंतर छाननीची प्रक्रिया सुरू आहे, अनेक शाळांमधील शुल्कवाढ नियमाला धरून केलेली दिसत नाही. अनियमितता असलेल्या शाळांवर निश्चित कारवाई केली जाईल.- नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी.