जिल्ह्यात जन-धन योजनेचे 60 हजार खातेदार

0
8

गडचिरोली – भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार दिल्लीत विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जन-धन योजना सुरू करून प्रत्येक देशवासीचे बॅंकेत खाते असण्याची प्रक्रिया आरंभली. या योजनेला देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातदेखील या योजनेने गती पकडली. आतापर्यंत जिल्ह्यात योजनेचे 60 हजार खातेदार झाले आहेत.

केंद्र शासनातर्फे पंतप्रधान जन-धन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दुर्बल प्रवर्गातील घटकांना विविध योजनांचा लाभ मिळणार असून खातेधारकाला एक लाखाची विमा सुरक्षा मिळणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 60 हजार खातेधारकांना जन-धन योजनेचा आधार देण्यात आला. या योजनेत बॅंक ऑफ इंडियाने आघाडी घेतली आहे. बॅंकेतर्फे जन-धन योजनेची सर्वाधिक 18 हजार 739 खाती उघडण्यात आली.

पंतप्रधान जन-धन योजनेअंतर्गत बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, युनियन बॅंक ऑफ इंडिया, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, वैनगंगा क्षेत्रीय ग्रामीण बॅंक आणि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा समावेश करण्यात आला आहे. वरील बॅंकांतर्फे जिल्ह्यात 2 लाख 20 हजार कुटुंबांचा सर्वे करण्यात आला. सर्वेदरम्यान 1 लाख 77 हजार 219 जणांचे यापूर्वीच बॅंक खाते उघडण्यात आल्याचे दिसून आले.

सर्वाधिक बॅंक खाती म्हणजे 1 लाख 62 हजार 152 बॅंक खाती ग्रामीण भागातील, तर शहर भागातील 15 हजार 67 बॅंक खात्यांचा समावेश आहे. खातेधारकास 30 हजारांचा जीवन विमा आणि 1 लाख रुपये अपघाती विमा, 5 हजारांपर्यंत थेट कर्जपुरवठा, शून्य बॅलन्स सुविधा, रुपये कार्डची सुविधा देण्यात आली आहे. या कार्डाने कोणत्याही बॅंकेच्या एटीएमद्वारे पैसे काढण्याची सोय उपलब्ध झाली आहे. खातेधारकांच्या मोबाईलवर योजनेसंदर्भात माहिती प्राप्त होत असल्याने योजनेची लोकप्रियता वाढली आहे. 10 वर्षांवरील मुलामुलींच्या नावेही खाते उघडण्याची सोय आहे. जुने बॅंक खाते जन-धन योजनेत समाविष्ट करण्याची सोयदेखील उपलब्ध आहे