जिल्हास्तरीय शालेय क्रीडास्पर्धेत चव्हाण वस्ती (सिद्धेवाडी) अव्वल क्रमांकावर

0
15

तासगाव,दि.31ः- सांगली जिल्हा परिषद सांगली अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा चव्हाण वस्ती (सिद्धेवाडी) तालुका तासगाव जिल्हा सांगली या शाळेने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत तीन क्रीडा प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केले.चालू वर्षी सन 2018/19 या वर्षीच्या जिल्हा परिषदेतील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे नुकत्याच पार पडल्या.

या स्पर्धेमध्ये या शाळेतील शुभांगी वसंत शेंडे (लहान गट मुली) या विद्यार्थिनीने लांब उडी व 50 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.त्याचबरोबर शुभांगी वसंत शेंडे,श्रावणी चंद्रकांत शेंडे, स्नेहा गणेश चव्हाण व श्‍वेता सतीश चव्हाण या विद्यार्थिनींनी रिले (लहान गट मुली) या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. एका वाडी-वस्तीवरच्या कमी पटाच्या शाळेने तब्बल तीन क्रीडाप्रकारात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अव्वल क्रमांक प्राप्त केल्याने संपूर्ण जिल्ह्यातून व परिसरातून शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.या शाळेचे मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री. मच्छिंद्रनाथ बसाप्पा कांबळे व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती अश्विनी महादेव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती च्या शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.