30.2 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home शैक्षणिक अभ्यास मंडळानी अधिकाधिक संदर्भ पुस्तके तयार करावीत-राज्यपाल

अभ्यास मंडळानी अधिकाधिक संदर्भ पुस्तके तयार करावीत-राज्यपाल

0
27

राज्यपालांच्या हस्ते प्राणीशास्त्र विषयाच्या १०० व्या पुस्तकाचे  प्रकाशन

मुंबई,दि.29- मुंबई विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अभ्यासमंडळाने तयार केलेल्या १०० व्या व विद्यापीठाने स्वतः प्रकाशित केलेल्या ‘टेक्सोनॉमी ऑफ कॉरडेट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन आज महाराष्ट्राचे  राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. डॉ. जी.बी.राजे, डॉ. दिलीप भारमल, डॉ.एम.एन. जांबळे, एस.एस.वाघमोडे आणि डॉ. एच.टी बाबर यांनी तृतीय वर्ष बीएस्सी प्राणीशास्त्र विषयासाठी ‘टेक्सोनॉमी ऑफ कॉरडेट्स’  या पुस्तकाचे लेखन केले आहे. या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना मा. राज्यपाल म्हणाले  की, प्राणीशास्त्र विषयातील शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन करताना आनंद होत असून आगामी काळात विदयापीठाच्या इतरही अभ्यासमंडळानी संदर्भ पुस्तके तयार करावीत. आज ऑक्सफर्ड विदयापीठ प्रेस प्रमाणे मुंबई विदयापीठानेही गुणवत्तापूर्ण आणि माफक दरात पुस्तके प्रसिध्द करावीत अशी अपेक्षा राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी, राज्यपालांचे प्रधान सचिव श्री संतोष कुमार, विशेष सचिव श्री राकेश नाथानी, प्रा. विनायक दळवी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय भामरे, वित्त व लेखा अधिकारी माधवी इंगोले यांच्यासह प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य, पुस्तकाचे लेखक आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल  कोश्यारी यावेळी म्हणाले की, जवळपास दीड वर्षापूर्वी प्राणीशास्त्र अभ्यासमंडळाने तयार केलेल्या ५० व्या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते तर आज शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. त्यामुळेच पुढील दोन वर्षात या अभ्यासमंडळाने पुस्तक तयार करण्याचे द्विशतक गाठावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष प्रा. विनायक दळवी यांच्या संकल्पेतून साकारलेला हा प्रकल्प आहे. विशेष बाब म्हणजे हे शंभरावे पुस्तक प्रा. विनायक दळवी यांना समर्पित केले असून या पुस्तकाची प्रस्तावना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव श्री सौरभ विजय यांनी लिहली असून फोरवर्ड डॉ. संजय जगताप, सहसंचालक, उच्च शिक्षण पनवेल यांनी दिली आहे.  अभ्यासक्रमावर आधारीत पुस्तक तयार करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल एवढ्या कमी किमतीत अशी पुस्तके विदयार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची किमया प्रा. विनायक दळवी यांनी साधली असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाने अलीकडच्या काळात  खूप चांगले उपक्रम हाती घेतले आहेत ज्यामध्ये, सर्व शिक्षकांसाठी शिक्षकांचा डेटाबेस तयार करणे, जिल्हा पातळीवर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करणे, परदेशातील संशोधक नेमणे, अभ्यासक्रम निर्मितीच्या समित्यांवर गुणवंत विद्यार्थ्यांना नेमणे, फ्लेक्सी अभ्यासक्रम तयार करणे, विद्यार्थ्यांना पर्यायी संशोधनासह अतिरिक्त क्रेडीटची सोय, विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी विशेष अभ्यासक्रमाची निर्मिती या अभ्यास मंडळाकडून करण्यात आली असून  अभ्यासक्रमावर आधारीत काढलेली पुस्तके ही खरं तर एक नम्र सुरूवात असून परदेशी विद्यापीठाच्या दर्जाला साजेशे संदर्भ ग्रंथ तयार करण्याचा प्रयत्न आमच्या शिक्षक प्रवर्गातून करण्यात येणार असल्याचेही कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अकबर दळवी यांनी केले तर प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाच्या १०० व्या पुस्तकाचे प्रकाशन  राज्यपालांचे हस्ते करण्यात आल्यामुळे मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी मा. राज्यपाल आणि पुस्तकनिर्मितीमध्ये ज्या सर्वांचे सहाय्य लाभले त्यांचे त्यांनी आभार मानले.