डॉ. पुरण मेश्राम नवे कुलसचिव

0
18

नागपूर ता.२3- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदावर कार्यकारी वित्त आणि लेखा अधिकारी डॉ. पुरण मेश्राम यांची एकमताने निवड करण्यात आली. शुक्रवारी या पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. त्यात 12 उमेदवारांचा समावेश होता. डॉ. पुरण मेश्राम यांचे नाव कुठल्याच प्रकारे चर्चेत नसताना त्यांच्या नावाचा घोषणेमुळे विद्यापीठात अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला हे विशेष.

विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदासाठी निवड समितीमध्ये मतभिन्नता आढळून आल्यावर कुलसचिवपदाच्या निवडीतही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत होती. शुक्रवारी निवड समितीसमोर 12 उमेदवारांनी आपले पावर पॉइंट प्रेझेंटेशन दिले. शिवाय प्रत्येकाची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर समितीच्या सदस्यांनी एकमत करून दोन नावे निवडली. यात डॉ. पुरण मेश्राम आणि भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्‍यामसुंदर भोगा या दोन नावांचा समावेश होता. यात प्रशासकीय कामाचा अनुभव डॉ. पुरण मेश्राम यांना अधिक असल्याने त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र देत अधिकृतरीत्या कुलसचिवपदावरील त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. यावेळी कुलगुरूंनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता ही नियुक्ती केल्याचे स्पष्ट केले. सोमवारी (ता. 25) ते आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील.

अखेर स्वप्नपूर्ती
गेल्या चार वर्षांपासून डॉ. पुरण मेश्राम कुलसचिवपदासाठी प्रयत्नरत होते. यापूर्वी डॉ. अशोक गोमाशे यांची निवड कुलसचिवपदावर झाली. त्यावेळी डॉ. मेश्राम यांनी अर्ज केला होता. याशिवाय विविध विद्यापीठांतही त्यांनी कुलसचिवपदासाठी अर्ज केला होता. मात्र, नागपूर विद्यापीठातच कुलसचिव होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.