आयटी क्षेत्रातल्या नोक-या संपुष्टात ?

0
15

मुंबई- कॅम्पस इंटरव्ह्यूमधून तंत्रज्ञानाची पदवी घेत असलेल्या शेकडो तरुणांना त्यांचे शिक्षण पूर्ण होण्याआधीच आयटी कंपन्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या देत असत. त्यामुळे आयटी क्षेत्र हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र मानले जात होते. पण, ही आशादायी स्थिती पुढील तीन वर्षांत म्हणजेच सन २०१८ पर्यंत संपुष्टात येण्याचा धोका आहे!

उत्पन्नवाढीनुसार रोजगारवाढीचे आयटी कंपन्यामधील सूत्र आता कोलमडू लागले असून या कंपन्यांचे उत्पन्न वाढले तरी त्या प्रमाण रोजगारवाढीच्या संधी कमी होत जाणार आहेत, असा महत्त्वपूर्ण अहवाल ‘क्रिसिल’ने सोमवारी प्रसिद्ध केला. सन २०१८ पर्यंत आयटी क्षेत्राची वाढ १३-१५ टक्क्यांनी होणार असली तरी त्यातुलनेत तरुणांना नोकरी मिळण्याची शक्यता कमी होणार आहे. आयटी क्षेत्रातील बदलत्या स्वरूपाचा सर्वाधिक फटका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे.

जागतिक मंदीमुळे भारतातील आयटी कंपन्यांच्या व्यावसाय‌कि संधी रोडावल्या, त्यातून व्यावसायिक विस्तारावर मर्यादा आल्या. त्यामुळे नफ्याचे प्रमाणही कमी होत गेले. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आयटी कंपन्यांना खर्चावर नियंत्रण आणावे लागले आहेत. त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांना घेण्यापेक्षा आहे त्या कर्मचा‍ऱ्यांची उत्पादकता अधिकाधिक वाढवण्यावर भर दिला जाऊ लागला आहे. त्यामुळे महसूलवाढीच्या बरोबरीने रोजगारवाढ हे गणित पुढच्या काळात आयटी क्षेत्रात बिघडलेलेच दिसेल, असे क्रिसिलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पुढील चार वर्षांत रोजगारनिर्मितीचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटेल. सन २०१४मध्ये १ लाख पाच हजार जादा नोकऱ्या निर्माण झाल्या. हे प्रमाण सन २०१८मध्ये ५५ हजारांवर येण्याची शक्यता असल्याचे अहवालात नोंदवण्यात आले आहे.