रोजगार मेळाव्यातून 227 उमेदवारांची प्राथमिक निवड

0
20
??????????????????????????????????????????????????????????

         गोंदिया, दि.21 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आमगाव, सालेकसा, देवरी व बिजेपार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त 17 मार्चला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आमगाव येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यात 227 उमेदवारांची विविध कंपन्यात प्राथमिक निवड करण्यात आली.

        मेळाव्याचे उद्घाटन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आमगावचे प्राचार्य श्री. सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय औद्योगिक संस्था आमगावचे श्री. तुमडाम उपस्थित होते. सदर रोजगार मेळाव्यास कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजु माटे, एमजीएनएफचे तेजस ठाकुर, डीएसडीसीचे संदीप टेंभुर्णीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

        सदर रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील नामवंत 9 कंपन्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. त्यांनी उपस्थित बेरोजगार युवक-युवतींची मुलाखत घेतली. त्याचवेळी 227 उमेदवारांची प्राथमिक निवडही करण्यात आली. या मेळाव्यात प्रत्यक्ष 233 उमेदवार उपस्थित होते. बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन यावेळी मेळाव्यात उपस्थित तरुणांना करण्यात आले. अशा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार देण्याचे कार्य केले जात असल्याचे सांगण्यात आले. आजचे युग हे कौशल्याचे युग असून ज्यांच्याकडे कौशल्य असेल त्यांना हमखास रोजगार मिळेल असे सांगितले.