नंदुरबार, दि. 3 :कामगारांच्या कल्याणासाठी शासनाने स्वतंत्र निधीची तरतूद केली असून प्रत्येक नोंदीत कामगार कुटुंबाला ३० गृहोपयोगी भांड्यांचा संच दिला जाणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले आहे.
ते शहादा तालुक्यातील नांदरखेडा,तोरखेडा,सारंगखेडा येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना गृहोपयोगी साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमास जि.प.सभापती हेमलता शितोळे पंचक्रोशीतील गावांचे सरपंच, अधिकारी, पदाधिकारी तसेच कामगार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री डॉ.गावित पुढे म्हणाले की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना त्यांच्या गरजेप्रमाणे मदत केली जाते. शिक्षण, आरोग्य,आणि भविष्य संरक्षणासाठीच्या विविध योजना या मंडळामार्फत सुरू आहे. ज्या जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजनेची आवश्यकता नाही, त्या काही मोजक्या जिल्ह्यात गृहोपयोगी साहित्य वितरणाची योजना सुरू करण्यात आली, त्यात आपल्या नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. कामगारांसाठी कल्याणकारी योजनांसोबत जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना राबवल्या जात असल्याचे सांगताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, गावात समाजाच्या लोकसंख्येला अनुसरून समाजमंदिरे उभारली जाणार आहेत, त्यासाठी या आर्थिक वर्षात किंवा पुढील आर्थिक वर्षात जून महिन्यात मंजूरी दिली जाईल. जिल्ह्यातील २ हजार बचत गटांना मदत करताना ते जो व्यवसाय निवडतील त्या व्यवसायाचे प्रशिक्षण, अर्थसहाय्य देण्याचा आदिवासी विकास विभागाचा आहे.
ते पुढे म्हणाले की, १ हजार क्रिकेट टीम्स, ८०० भजनी मंडळे, ३७ बॅंड पथकांना उपयुक्त सर्व साहित्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २ हजार लोकांना प्रत्येकी दोन गायी स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी दिल्या जाणार आहेत. मागेल त्याला शेळी गट दिला जाणार आहे. शेळी गट योजना आदिवासी बांधवांसाठी १०० टक्के मोफत असून बिगर आदिवासी समुदायाच्या लोकांसाठी ती ५० टक्के दराने दिली जाणार राबवली जाणार आहे. तसेच शबरी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांना शेतीपूरक व्यवसायांसाठी केवळ ४ टक्के दराने कर्ज दिले जाणार आहे. त्यासाठी बचत गटात ६० टक्के आदिवासी व उर्वरीत ४० टक्के सभासद बिगर आदिवासी असले तरी चालणार आहेत. शबरी घरकुल योजनेसह विविध योजनांमधून प्रत्येक समुदायासाठी घरकुले केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जात आहेत. २ वर्षात २४ हजार घरे मंजूर केली जाणार आहेत.
जिल्ह्यातील ९० टक्के शेती सिंचनाखाली आणली जाईल, असे सांगताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, तापी नदीवर १६ उपसा सिंचन योजनांच्या कामाला गती देण्यात आली आहे. बंद पडलेल्या सिंचनाच्या लिफ्ट पुन्हा कार्यान्वित केल्या जातील, प्रसंगी नव्या लिफ्टस् ची निर्मितीही केली जाईल.शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून इथला शेतकरी एकरी ३ ते ५ लाख उत्पन्न काढू शकेल एवढे सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.
थोडक्यात पण महत्वाचे…
कामगारांना दिला जाणार ३० गृहोपयोगी वस्तुंचा संच
२ हजार बचत गटांना प्रशिक्षणासह अर्थसहाय्य करणार
एक हजार क्रिकेट टीम्स् ला खेळण्यांचे साहित्य दिले जाणार
८०० भजनी मंडळांना भजन साहित्य
३७ बॅंड पथकांना वादन साहित्य
दोन हजार नागरिकांना गायींचे तर मागेल त्याला शेळी गटांचे वितरण करणार
जिल्ह्यातील ९० टक्के शेती सिंचनाखाली आणनार
२४ हजार घरकुले देण्याची क्षमता
बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी शबरी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून ४ टक्के दराने कर्ज देणार