१ हजार ६६८ उमेदवारांची निवड – राजू माटे

0
200

  ५८५ उमेदवार झाले रुजू

प्रशिक्षण योजनेत ऑनलाईन सहभागी होण्याचे आवाहन

         गोंदिया, दि.२० : विविध क्षेत्रात केवळ अनुभव नसल्यामुळे पूर्णवेळ रोजगार मिळत नाही. अशा युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही महत्त्वकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ६६८ युवकांची निवड करण्यात आली आहे. यापैकी ५८५ उमेदवार विविध आस्थापनांमध्ये रुजू झाले आहेत, अशी माहिती कौशल्य विभागाचे राजू माटे यांनी दिली.

         मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी सुरू केलेल्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यातील ४ हजार ४७९ उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शासकीय व खाजगी क्षेत्रात २ हजार ८४९ रिक्तपदे अधिसूचित करण्यात आले आहे. युवकांनी या युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन माटे यांनी केले आहे.

         मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी 6 महिन्याचा कालावधी असून शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कालावधीत 12 वी पास उमेदवारांना प्रतिमाह 6 हजार रुपये, आयटीआय अथवा पदवीकाधारकांना 8 हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन देण्यात येणार आहे.

          ९९ शासकीय आस्थापनात २३९८ अधिसूचित शासकीय पदे व १६ खाजगी आस्थापनामध्ये ४५१ अधिसूचित खाजगी पदे असे एकूण ११५ आस्थापनामध्ये २८४९ पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. उमेदवारी अर्ज सादर केल्यापैकी आतापर्यंत या योजनेंतर्गत रिक्त असलेल्या पदावर आतापर्यंत ५८५ उमेदवार रुजू झाले आहेत. अन्य रिक्त पदासाठी सुशिक्षीत युवकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असेही राजू माटे यांनी आवाहन केले आहे.

         कौशल्य विकास विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in यावर नोकरी सदर हा टॅब ओपन होईल. यावर त्यानुसार नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे. आपली नोंदणी यशस्वी झाल्याबाबतचा संदेश आल्यानंतर नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. नोंदणी विनामुल्य आहे. विविध खाजगी आस्थापनांने आवश्यक असलेल्या मुनष्यबळाची मागणीसुध्दा या पोर्टलवर नोंदवावी.