अनिवासी निशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा परिचय मेळावा उत्साहात पार पडला
वाशिम, दि. ८ ऑक्टोबर: सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहे. तरुणांनी आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घेत उद्योजकीय क्षेत्रात भरारी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) चे प्रकल्प अधिकारी गौरव इंगळे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे पुरस्कृत आणि एमसीईडी, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी अनिवासी निशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा परिचय मेळावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष खादी ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथीकर, प्रमुख पाहुणे बार्टी प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे, तसेच प्रमुख मार्गदर्शक गौरव इंगळे होते.राज्य समन्वयक बार्टी हेमंत वाघमारे व अमरावती विभागीय अधिकारी किशोर अंभोरे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला.मेळाव्यात दिगांबर लोखंडे (खादी ग्रामोद्योग), ऋषिकेश तन्मने (डीपीएमयू), यशस्वी उद्योजक किरण पडघान, आणि बार्टी समतादूत संघमित्रा गवई यांनी प्रेरणादायी विचार मांडले.
या प्रसंगी तरुणांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, बार्टी उद्योजकता विकास योजना, मुद्रा योजना, तसेच खादी ग्रामोद्योग आयोगाच्या योजना, हस्तकला, अन्नप्रक्रिया व लघुउद्योग क्षेत्रातील अनुदान व बिनतारण कर्ज योजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यशस्वी उद्योजक किरण पडघान यांनी सांगितले की, “उद्योजक होणे म्हणजे स्वावलंबनाचा मार्ग आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीचा पाया” आहे. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग सुरू करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन अमित इंगोले व बंडू भगत यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमानंतर प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या, ज्यातून निवड झालेल्या युवक-युवतींना एक महिन्याच्या निवासी प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.बार्टी आणि एमसीईडीचा हा संयुक्त उपक्रम वाशिम जिल्ह्यातील तरुणाईसाठी स्वावलंबनाचा नवा अध्याय ठरणार आहे.




