28.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home रोजगार/व्यापार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजना

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजना

मिशन बिगिन अगेन

0
420

भंडारा,दि. 23:- ज्या समाज घटकाकरीता कोणतेही महामंडळ नाही अशा मराठा, ब्राम्हण इत्यादी समाजातील आर्थिक मागास ( 8 लाखाच्या मर्यादेत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न) असलेल्या नागरिकांना बँकेमार्फत विविध उद्योग धंदा, व्यवसाय सुरु करण्याकरीता किंवा व्यवसाय वाढविण्याकरीता मिळणाऱ्या कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करुन आर्थिक बोजा कमी करणे हे उदि्दष्ट अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे असून त्यासाठी तीन योजना राज्यात कार्यान्वित आहेत.  .

राज्यशासनाने आर्थिक दुर्बल घटकातील युवकांमध्ये उद्योजकता वाढविण्यासाठी जाहिर केलेल्या छत्रपती राजाराम महाराज अभियानांतर्गत  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज परतावा योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत.

            वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना-आर्थिकदृष्टया मागास उमेदवारांना बँकेतर्फे स्वंरोजगार, उद्योग उभारणी करीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळाकडून  लाभार्थ्यांना दिला जाईल.

            गट कर्ज व्याज परतावा योजना- आर्थिकदृष्टया मागास घटकातील उमेदवारांचा बचत गट, एलएलपी, एफपीओ, कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत इतर संस्था यांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणी करीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

गट प्रकल्प कर्ज योजना –महामंडळामार्फत सदर योजनेंतर्गत पात्र शेतकरी उत्पादक कंपनीला 10 लाखापर्यंत बिनव्याजी दराने कर्ज रक्कम उद्योजकाकरीता देण्यात येईल.

             योजेनकरीता पात्रता – अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. ज्या प्रवर्गासाठी कोणतेही महामंडळ कार्यरत नाही अशा प्रवर्गातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. 1 जानेवारी 2019 पासून या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी उमेदवाराच्या वयोर्मादेची अट पुरुषांकरीता जास्तीत जास्त 50 तर महिलांकरीता 55 वर्ष असेल. लाभार्थ्यांचे कौटूंबिक वार्षिक उत्पन्न शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेत 8 लाखाच्या मर्यादेत असल्याचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र अथवा वैयक्तिक पती व पत्नीचे प्रमाण वार्षीक सकल उत्पन्न ग्राहय धरण्यात येईल.

https://udyog.mahawayam.in  या संकेतस्थळावरुन लाभार्थ्यांसाठी निर्माण झालेले एलओआय, मंजूरी पत्र पाहून गरजू व्यक्तींना बँकेने आपल्या नियमानुसार कर्ज देवून सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आलेले आहे. तसेच बँकांनी त्यांच्याकडील स्वयंरोजगार, उद्योगाकरीता असलेली कर्ज प्रकरणे मंजूर करण्याच्या अगोदर गरजू उमेदवाराला महामंडळाच्या संकेतस्थळावर त्यांची नांव नोंदणी करुन एलओआय, मंजूरी पत्र प्राप्त करण्यास सांगावे. जेणेकरुन अशा गरजू उमेदवारांना व्याज परतावा देणे शक्य होईल. सदर योजनेच्या अधिक माहितीकरीता जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे  जिल्हा समन्वयक सोनु उके यांचेशी संपर्क साधावा.