मुंबई : महाराष्ट्र पक्षिमित्रतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला. इतर पुरस्कारांमध्ये पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार तांदलवाडी जि. जळगाव येथील उदय सुभाष चौधरी यांना तर पक्षी संशोधन पुरस्कार डॉ. अमोल सुरेश रावणकर, अचलपूर व किरण मोरे, अमरावती यांना विभागून देण्यात आला आहे. पक्षी जनजागृती पुरस्कार नाशिक येथील सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे.महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली.
सोलापूरमध्ये होणार पुरस्कार वितरण
यंदाच्या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे. यावर्षी ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे २०२१ मध्ये आहे. या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले जाणार आहे.‘यापुढे जन्मगावी राहण्यातच आनंद
पक्ष्यांना आपल्या मूळ वसतिस्थानाचे आकर्षण असते. माझे स्थलांतर विदर्भात झाले होते पण पक्ष्यांप्रमाणे मी सोलापूरला आलो. यापुढे जन्मगावी राहण्यातच मला आनंद आहे, असे मत वनऋषी मारुती चितमपल्ली यांनी गुरुवारी व्यक्त केले. मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी एक लाख नव्या शब्दांची भर घालणारे वनऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या नावे सिद्धेश्वर वनविहार येथील निसर्गरम्य परिसरात ‘अरण्यऋषी कक्ष’ स्थापन केला आहे. सरकारने जाहीर केलेल्या पक्षीसप्ताह आणि त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्या कक्षाचे उद्घाटन चितमपल्ली यांच्या हस्ते करण्यात आले.