माजी खा. बाळकृष्ण वासनिक यांचे निधन

0
9

नागपूर दि. ११: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खा. बाळकृष्ण वासनिक यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी निधन झाले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह विविध पक्षाचे कार्यकर्ते व नेत्यांनीत्यांच्या अंत्यदर्शनाकरिता गर्दी केली होती.बाळकृष्ण वासनिक १९५७ व १९६२ साली भंडारा लोकसभा मतदार संघातून तर १९८0 साली बुलढाणा लोकसभा मतदार संघातून विजयी झाले होते. विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक व राजकीय कार्याला त्यांनी सुरुवात केली होती. दलित चळवळीच्या माध्यमातून समाजातील दुर्बल, शोषित, पीडित घटकांना तसेच कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता त्यांनी अनेकदा आंदोलन केले. दलितांच्या आरक्षणाच्या मुद्यावर लोकशाही तंत्राचा अवलंब करून त्यांनी लोकसभा गाजवली होती. विदर्भाचे ते कट्टर सर्मथक होते. एवढेच नव्हे तर १९६७ साली महाविदर्भ राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी तीव्र लढा उभारला होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचे ते वडील आहे. त्यांच्या पश्‍चात मुलगा मुकुल वासनिक, दोन मुली डॉ. दिप्ती व डॉ. सिमा, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनाकरिता विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यांची अंत्ययात्रा नागपूर येथील गांधीनगरातील त्यांच्या निवासस्थानावरून ११ सप्टेंबर रोजी निघेल. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.