सालेभाट्यातून दारूबंदीचा एल्गार-अँड.पारोमिता गोस्वामी

0
16

लाखनी दि.२-: आर्थिक विकासाचे अनेक टप्पे राबवित असताना व्यसनमुक्ती हा सर्वात पहिला टप्पा आहे. जिल्ह्याच्या विकासाची चर्चा करताना हा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी जिल्हाभर दारुबंदीची चळवळ ऊभारण्यात यावी, असे कळकळीचे आवाहन चंद्रपूरच्या श्रमिक एल्गार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष अँड.पारोमिता गोस्वामी यांनी केले.
सालेभाटा येथील दारुबंदी जनजागृती सभेत त्या बोलत होत्या. अँड.गोस्वामी म्हणाल्या, एका गावात दारुबंदी चळवळ राबवून उपयोग नाही. आज इथून बंद झालेला दुकान दुसर्‍या गावात सुरु होईल. पुन्हा तिथे आंदोलन सुरु होईल, आयुष्यभर महिलांनी आंदोलननेच करावीत काय, त्यापेक्षा एकाचवेळी संपूर्ण जिल्ह्यात दारुबंदीसाठी आंदोलन उभारा, श्रमीक एल्गारची पूर्ण ताकद तुमच्या पाठीशी उभी राहील, असे आश्‍वासन यावेळी गोस्वामी यांनी दिले. सालेभाटा येथील चौक दारुभट्टी चौक म्हणून ओळखला जातो. गावात दारुबंदी झाल्यानंतर चौकाचे नाव बदलावे लागेल, चौकाच्या नामकरणासाठी मी नक्की येईल असे त्यांनी सांगितले.
सालेभाटा येथील महिलांनी २0 ऑगस्टपासून गावामध्ये दारुबंदीचे आंदोलन सुरु केले आहे. महिलाशक्ती दारुबंदी संघर्ष समितीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या महिला, बालकल्याण सभापती शुभांगी राहांगडाले या होत्या. प्रमुख अतिथी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंता एंचिलवार, अँड.पी.के. राहांगडाले, पूर्ती साखर कारखान्याचे संचालक अनिल मेंढे, खैरी (दिवान) येथील दारुबंदी आंदोलक माधुरी नखाते, राजेंद्र फुलबांधे, पवनी शहर भाजप अध्यक्ष हरिष तलमले, सालेभाटा येथील दारुबंदीचे मुख्य प्रवर्तक नरेश बोपचे, ग्राम पंचायत सदस्य कैलाश भगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव रवी खोब्रागडे, अँड.प्रमोद भांडारकर, जिल्हापरिषद सदस्य ज्ञानेश्‍वर राहांगडाले, पंचायत समिती सदस्य मोरेश्‍वरी पटले, इंजि. प्रदीप राहांगडाले, श्रमीक एल्गारचे विजय सिद्धावार, गायक प्रेमदास ऊईके, अनिता कुलरकर खैरी / दीवान, छाया माहुरे भावळ, सालेभाटा येथील सरपंच मिलींदा टेंभुर्णे, पोलिस पाटील डॉ.संजय बोपचे, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष एडीलाल राहांगडाले आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते. महिला शक्ती दारुबंदी संघर्ष समीतीच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. अँड.पारोमिता गोस्वामी यांनी मशाल पेटवून मेळाव्याचे उद््घाटन केले. संचालन नरेश बोपचे यांनी केले. समितीच्या उपाध्यक्ष शालू वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.