सावरटोला येथे रंगले ‘महाविद्यालयीन महायुद्ध’

0
23

सेलिब्रेटींचे आकर्षण : मस्ती..पावित्र्य अन् नृत्याविष्काराची धम्माल
अर्जुनी मोरगाव दि.२४:-प्रचंड उत्साहाचे वातावरण.. सेलिब्रेटींना पाहण्यासाठी प्रेक्षकांची ताणलेली उत्कंठा.. उत्कृष्ट सजविलेला रंगमंच आणि आकर्षक रंगीबेरंगी प्रकाशझोतांनी उजळून निघालेला आसमंत.. अत्याधुनिक ध्वनी नियंत्रण व्यवस्थेवर मदहोश करणारे संगीत आणि हवीहवीशी वाटणारी मंद वार्‍यासह अंगावर झेपावणारी थंडी.. हे वातावरण एखाद्या शहरातील कॉलेजच्या झगमगत्या गॅदरिंगचे नाही, तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला या गावातील होते. येथे रंगलेल्या नृत्य स्पर्धेतील या वातावरणाने प्रेक्षकांसह सार्‍यांना मंत्रमुग्ध करून टाकले.
उत्साहाला आलेली भरती..प्रचंड जल्लोष.. टाळ्यांचा एकच कडकडाट.. तरुणाई व आबालवृद्ध महिला पुरुषांना नृत्याविष्काराची प्रतीक्षा.. तेवढय़ातच ‘एंट्री’ होते ती परीक्षकांची. परीक्षकातील वुगी-बुगी व दम-दमा-दम शो विजेती अपूर्वा काकडे हिच्या नृत्याने कार्यक्रमाचा श्रीगणेशा होतो. तिच्या ‘टिप-टिप बरसा पाणी’ या गाण्यावरील नृत्याने अख्खे सावरटोला मदहोश झाले होते.
स्पर्धेची खरी सुरुवात होते एन.एम.डी. कॉलेज गोंदियाच्या समूह नृत्याने. राहुल बघेले व सकारी संचाने अदिमायेचा गरज व गणेशवंदनायुक्त बॉलिवूड समूह नृत्याचे अप्रतिम सादरीकरण करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. जयदुर्गा कनिष्ठ महाविद्यालय गौरनगरच्या चमूने येत वतन..ये वतन.. जलवा..जलवा या देशभक्तीपर गीताने प्रेक्षकांमध्ये राष्ट्रभिमानाचे स्फुरण जागविले. मुकुंद विद्यालय दिघोरी-मोठीच्या चमूने प्रस्तुत केलेल्या ‘मला जाऊ द्या ना घरी..आता वाजले की बारा.. या सोलो लावणीने तर रसिकांवर मोहिनीच घातली.
सुरेल गीत, संगीत, नृत्य, आदिमायेचा गजर, अंधकार रात्री रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, रसिकांचा उत्साह व पावित्र्याने अगदी वातावरण भारले गेले. एकापेक्षा एक अशा सरस लोकप्रिय हिंदी व मराठी गीतांचे सादरीकरण करुन स्पर्धकांनी उपस्थितांची दाद घेतली.
या धम्माल कार्यक्रमात झालेल्या प्रत्येक उत्कृष्ट सादरीकरणामुळे परीक्षकांनाही बुचकळ्यात पाडले होते. सावरटोलाच्या खतरा मंडळाने आयोजित केलेल्या या महाविद्यालयीन महायुद्धास रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
या वेळी सुमारे पाच हजाराहून अधिक प्रेक्षकांनी सावरटोला या खेडेगावात हजेरी लावून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे आणखी दोन वैशिष्ट्ये आहेत. इजाज खान यांनी हिंदी व मराठी भाषेत अप्रतिम सूत्रसंचालन केले. यावेळी त्यांनी नॉन स्टॉप ६0 चित्रपट अभिनेते व राजकीय व्यक्तींचे डॉयलॉग सादर केले.
इंडिया रायजींग स्टार व इंडिया गॉट टॅलेंट विजेते जादूगर आयी यांनी जादूचे प्रयोग सादर करुन प्रेक्षकांना अवाक केले. या स्पर्धेत ११ हजाराचे प्रथम पारितोषिक एस.एस.जे. महाविद्यालय अर्जुनी मोरगाव, सात हजाराचे द्वितीय पारितोषिक डी.बी. सायन्स महाविद्यालय गोंदिया तर पाच हजाराचे तृतीय पारितोषिक अनिल रामटेके सानगडी यांनी पटकाविले. हा कार्यक्रम गावकर्‍यांसाठी अविस्मरणीय ठरला.