स्व.मुंडेच्या आयुष्यावरील ‘संघर्षयात्रा’ येत्या १९ फेब्रुवारीला येणार

0
12

मुंबई, दि.3 : कष्टक-यांसाठी झटणारा झुंजार नेता म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘संघर्षयात्रा’ हा चित्रपट येत्या १९ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. भाजप चित्रपट युनियनकडून आज ही घोषणा करण्यात आली.ग्रामविकास व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या आक्षेपानंतर चित्रपटातील आक्षपार्ह दृष्यांचे पुनर्चित्रीकरण करण्यात आले आहे.
या चित्रपटात शरद केळकर यांची मुख्य भूमिका असून श्रृती मराठे, ओंकार कर्वे, दिप्ती भागवत यांच्याही भूमिका आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण करत आहेत.

आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला असून येत्या १९ फेब्रुवारीला महाराष्ट्रातील २८३ चित्रपटगृहांमधून प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते व भाजप चित्रपट युनियनचे अध्यक्ष संदिप घुगे यांनी आज दिली.
गोपीनाथ मुंडे अनेकांचे आदर्श आहेत. त्यामुळे त्यांचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले. या चित्रपटातून होणा-या नफ्यातील एक टक्के नफा आम्ही महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत म्हणून देणार आहोत, असे निर्माते संदिप घुगे यांनी यावेळी सांगितले. सामाजिक बांधिलकी व गोपीनाथ मुंडे यांना आपल्या कृतीतून आदरांजली वाहण्याच्या हेतूने आम्ही ही मदत देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.