नागपूर : राज्यातील १९०४९ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पॅकेजची घोषणा करू, अशी ग्वाही वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिली. टिळक पत्रकार भवनतर्फे आयोजित ‘मिट द पे्रस’ कार्यक्र मात ते बोलत होते.
शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व विभागाकडून माहिती घेतली आहे. परंतु त्यांना थोडा धीर धरावा लागेल. जनताभिमुख सरकार ही आमची संकल्पना आहे. निवडणुकीत मतदारांनी जनादेश भाजपच्या बाजुने दिला. अपूर्णांकातून पूर्णांकात जाण्याचा प्रयत्न आहे. ३ लाख ४४४ हजार कोटींचे कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. २३ हजार कोटी त्यावरील व्याजापोटी जातात. पैसे नसले तरी आत्मविश्वास आहे. निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्व विभागांना मार्च महिन्यात खर्चाची वाईट सवय लागली आहे. परंतु आता या महिन्यात १५ टक्केहून अधिक खर्च करता येणार नाही. १२५० योजनांचे आजवर नियोजनच झालेले नाही. या योजना लोकांसाठी फायद्याच्या कशा आहेत. हे पटवून द्यावे लागेल. असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर अर्चना डेहनकर, श्रीकांत देशपांडे, पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व सचिव अनुपम सोनी आदी उपस्थित होते.