कवींचा देश!

0
7

कवींचा देश!

उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या
मधोमध एक कवीचा देश आहे
अतिशय सुंदर डौलदार दिमाखात
देशाच निशाण फडफडत आहे वाऱ्याच्या झोतावर

हल्ली अश्यात तिथल्या अनेक शहरांत
पथ दिवे जळतात
अन कवीचं काळीज ही
काजळी पसरलीय शहरभर
हा उगवतीचा देश चिंताक्रांत आहे.

देशाच्या मधोमध राजधानीच्या शहरात
चौकात सभा भरवून
लोकांनी खलबत करून
हक्क सांगितला आहे आकाशावर
देशाच्या सामूहिक छतावर
नाव कोरायची आहेत म्हणे लोकांना
आठवत नाहीत नाव बापजाद्यांची
आणि जीर्ण झालेल्या वंशावळीची
तरीही वाटून घ्यायचं आहे आकाश

कवीच्या देशात नद्यांच्या पात्रात
इवलिशी बाळ पोहत आहेत
बालसुलभ क्रिडेत व्यत्यय आणू पाहत आहे
चौकात भरलेली सभा
घोषणा हलकल्लोळ

लोकांचा ताफा आता नदीच्या दिशेने धावतो आहे
नदीवरही मालकी हक्क सांगणार आहेत म्हणे.
नदीच्या मधोमध भिंत बांधून घ्यावी
आकाशातली वंशावळ पात्रात ही उतरावी
अशी लोकांची एका सुरात मागणी आहे.

लोक गात आहेत गाणे
एका सुरात संगीतमय होऊ पाहते आहे कवीचा देश !
मला शोक गीताच्या ओळी सुचत आहेत!

– कवयित्री कविता थोरात
– 9834245430