निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नव्या वर्षांत प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक, युवा महोत्सव, महानाटय़

0
5

गोंदिया(खेमेंद्र कटरे)– आज सोमवारपासून सुरू झालेले २०२४ हे नवे वर्ष निवडणुकीचे असल्याने राज्य शासनाने पहिल्या सहा महिन्यांतच विविध विभागांच्या माध्यमांतून अनेक महोत्सवांचे आयोजन केले असून त्यासाठी घसघशीत आर्थिक तरतूदही केली आहे.०२३ पासूनच अनेक सरकारी कार्यक्रमांच्या माध्यमातून शासनाच्या कामाची प्रसिद्धी व प्रचार सुरू असून त्यावर कोट्यावधीचा निधी आजपर्यंत उधळला गेला आहे. कधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध गावांमधील माती गोळा करणे असो किंवा विकास यात्रेच्या माध्यमातून केंद्राच्या योजनांची माहिती देणे असो. महाराष्ट्र सरकारही यात मागे नाही, ‘सरकार आपल्या दारी’च्या माध्यमातून राज्यभर अनेक कार्यक्रम राज्याच्या विविध भागात झाले आहे.

आत्ता  सोमवारपासून सुरू झालेल्या २०२४ ची सुरुवातही विविध महोत्सवांच्या माध्यमातून होत आहे. सांस्कृतिक विभागाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४  दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात सलग पाच दिवस महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. विविध राज्यातील संस्कृतीचे आदानप्रदान, लुप्त होत चाललेल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन आणि स्वातंत्र्यलढय़ाची माहिती लोकांपर्यंत पोहचवणे यासाठी हा कार्यक्रम असल्याचे या खात्याच्या २२ डिसेंबरला काढलेल्या शासन निर्णयात नमूद आहे.याकरीता प्रत्येक जिल्ह्याला 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

कार्यक्रम काय?

’ राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा खात्यातर्फे १५ जानेवारीपासून प्रत्येक जिल्ह्यात युवा महोत्सव होणार आहे. युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून हा उपक्रम असल्याचा दावा शिक्षण विभागाने २२ डिसेंबरला काढलेल्या शासन निर्णयात केला आहे.

’ पर्यटन व सांस्कृतिक खात्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या३५० व्या राज्याभिषेक वर्षांनिमित्त जून २०२३ पासून विविध कार्यक्रम राज्यभर घेतले जात आहेत. याच उपक्रमाचा पुढचा भाग म्हणून आता जानेवारी ते जून २०२४ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाटय़ महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी ३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून महानाटय़ाची प्रसिद्धी आणि आयोजनाच्या खर्चासाठी प्रत्येक जिल्ह्यांना निधी देण्यात आला आहे.