आयुष्यमान भारत योजने अंतर्गत अंडवृद्धी शस्त्रक्रिया होणार मोफत

0
10

गोंदिया,दि.01-  राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हत्तीरोग दूरीकरण मोहिम अनुषंगाने अंडवृद्धी शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत योजने अंतर्गत मोफत करुन घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी गोंदियावासियांना केले आहे.
आयुष्यमान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्ययोजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना ‘सन २०१८ मध्ये सुरू केली आहे. या योजनेमध्ये केंद्र सरकार गरीब कुटुंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटुंबांना आरोग्य विमा उपलब्ध करते. याद्वारे रुग्णालयातील ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळू शकतो त्यासाठीची आवश्यक पात्रता विहित करनेत आलेली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
हत्तीरोग हा एक दुर्लक्षित असा आजार असून यामध्ये हत्तीपाय आणि अंडवृद्धी ही लक्षणे दिसून येतात. अंडवृद्धी या आजारासाठी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करून या आजाराचे प्रमाण निश्चित कमी करता येते. जिल्हात 562 अंडवृद्धी रुग्णांची नोंदणी झाली असुन 100 टक्के नोंदणी झालेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया होण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये सदर शस्त्रक्रिया मोफत होणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी दिली आहे.
महात्मा जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंतचे उपचार आरोग्य विमाच्या माध्यमातून मोफत होतात. त्यामुळे उपचारापूर्वी आपले नाव आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट आहे का? याची खात्री करणे आवश्यक आहे त्यांना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा मोफत मिळणार आहे. त्यामुळे सर्व अंडवृद्ध रुग्णांनी सर्वप्रथम निकषानुसार आयुष्यमान भारत कार्ड काढुन घ्यावे व हे कार्ड काढलेनंतर त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही जवळच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करून घेण्याचे आवाहन डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी केले आहे.याबाबत कुठलीही अधिक माहिती साठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधन्याचे आवाहन जिल्हा हिवताप विभागाने केले आहे.
कोणत्या अंगीकृत रुग्णालयात होणार शस्त्रक्रिया –
या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात एकूण अकरा रुग्णालय अंगीकृत असून त्यापैकी सहा शासकीय व पाच खाजगी रुग्णालय आहेत.यात गोंदिया शहरातील  न्यू गोंदिया हॉस्पिटल,ब्राह्मणकर हॉस्पिटल, बाहेकर हॉस्पिटल,बालाजी नर्सिंग होम, रिलायन्स हॉस्पिटल तर शासकीय  कुवर तिलक सिंह सरकारी रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा, ग्रामीण रुग्णालय देवरी, ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव, ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी यांचा समावेश आहे.