संमेलनाध्यक्षापदाची माळ डॉ. सदानंद मोरेंच्या गळ्यात!

0
10

पुणे- घुमान येथे होणा-या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ संतसाहित्याचे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या गळ्यात पडली आहे. पुढील वर्षी पंजाबमधील घुमान येथे एप्रिल महिन्यात साहित्य संमेलन होणार आहे. संमेलन अध्यक्षपदासाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पार पडली होती. त्यानंतर आज मतमोजणी झाली. त्यात मोरेंनी 1019 पैकी तब्बल 498 मते घेऊन पहिल्याच फेरीत बाजी मारल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी जाहीर केले.

संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीची मतमोजणी आज सकाळी साडेनऊपासून साहित्य महामंडळाच्या कार्यालयात सुरु होती. अध्यक्षपदाची निवडणूक यंदा चौरंगी झाली. यात डॉ. सदानंद मोरे, डॉ. अशोक कामत, पुरुषोत्तम नागपुरे आणि भारत सासणे हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, मतदारांनी मोरे यांच्या नावाला पसंती दिली आहे. यंदाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विक्रमी 90 टक्के मतदानाची नोंद झाल्याने चुरस निर्माण झाली होती. 1070 मतदारांपैकी 1020 साहित्यिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यातील एक मतपत्रिका कोरी होती तर 27 मते अवैध ठरविली गेली. 992 मते वैध धरण्यात आली त्यात मोरेंनी 498 तर अशोक कामत यांनी 427 मते घेतली.

संत नामदेव यांच्या कर्मभूमीत एप्रिल 2015 मध्ये होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी आनंद व्यक्त करीत सर्वांचे आभार मानले. आपले अध्यक्षपद दिलीप चित्रे आणि भा. पं. बहिरट यांना अर्पण करीत असल्याचे मोरेंनी सांगितले. निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांनी सौजन्याची वागणूक दिली त्याबद्दल त्यांनी त्यांचेही आभार मानले.

संत नामदेवांच्या कर्मभूमित हे संमेलन होणार असल्याने या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एखादा संत साहित्याचा अभ्यासक असावा अशी या क्षेत्रातील मंडळींची इच्छा होती. त्यानंतर मोरे यांनी संमेलनाध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता व आता त्यांचीच निवड झाल्याने या संत साहित्य क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.