बाळासाहेबांच्या स्मारकासाठी फडणवीसांकडून समिती

0
10

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशं असे भव्य स्मृती स्मारक उभारण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विशेष सरकारी समितीची स्थापना केली आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीत मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, मुंबईचे पालिस आयुक्त राकेश मारिया यांचा समावेश आहे.

मात्र, या समितीत राजकीय नेत्यांची किंवा पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे का नाही याबाबत मात्र माहिती देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांच्या दुस-या स्मृतीदिनी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे मुंबईत भव्य स्मारक बांधणार असल्याची घोषणा केली होती. तसेच याबाबत लवकरच विशेष सरकारी समिती स्थापन केली जाईल असेही सांगितले होते. त्यानुसार फडणवीस यांनी आपले शब्द पाळत महिन्याच्या आतच समितीची स्थापना केली आहे.

या समितीचे अध्यक्ष व राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले की, बाळासाहेबांचे मुंबईत भव्य स्मारक व्हावे यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समितीची लवकरच बैठक बोलावली जाईल. तसेच बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा, स्मारकाचे स्वरूप याबाबत चर्चा केली जाईल. बाळासाहेब ज्या परिसरात राहत होते त्या वांद्रे परिसरात स्मारक असावे अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यानुसार त्या परिसरात जागेचा शोध घेतला जाईल. दक्षिण मुंबईतही काही जागा उपलब्ध आहेत तेथेही स्मारक उभारण्याचा विचार केला जाऊ शकतो. शिवसेनेच्या याबाबत काही सूचना आल्यास त्याचा विचार करू असेही क्षत्रिय यांनी सांगितले.

बाळासाहेबांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे स्मारक उभारण्याकरिता आघाडी सरकारनेही होकार दिला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय व विविध नेत्यांची समिती नेमण्यात आली होती. मात्र, या समितीकडून कोणतेही भरीव काम झाले नाही. अखेर राज्यात सत्ता परिवर्तन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत.