
बालकांचे वय आनंद, उत्साह उधळण्याचे, खेळण्याचे, बाळगण्याचे असते. या वयात त्यांच्या मनावर आघात पडल्यास त्यांना त्याच्यातून बाहेर काढणे कठीण जाते. बालकांच्या या आघातावर मायेची फुंकर घालण्यासाठी तसेच त्यांच्यावरील नैसर्गिक कला गुणांना वाढ देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून चाचा नेहरु बाल महोत्सव साजरा करण्यात येतो. गोंदिया जिल्ह्यात नुकताच बाल महोत्सव महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा मोरे यांच्या नेतृत्वात पार पडला.
अनाथ व गरजु मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी गोंदिया येथे दिनांक 10 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून अनाथ व निराश्रीत मुलांना क्रिडा, बौध्दिक आणि सांस्कृतिक स्पर्धांद्वारे त्यांच्यातील आत्मविश्वास, सांघिक भावना आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन दिले जाते. यामुळे बालकांचा उत्साह द्विगुणीत होत असतो.
हा कार्यक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आला होता. त्यातून मुलांच्या शिक्षणाचे, हक्कांचे आणि कल्याणाचे महत्व अधोरेखित होते.
बाल महोत्सवाचे उद्घाटन दि.10 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी किर्तीकुमार कटरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी वैद्यकिय अधिकारी विनोद जायस्वाल, बाल विकास प्रकल्प अधिकारी तिरोडा विनोद चौधरी, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष देवका खोब्रागडे, पोलीस उपनिरिक्षक पुजा सुरळकर, बाल न्याय मंडळाच्या सदस्य वंदना दुबे, शासकिय मुलांचे निरिक्षणगृह बालगृहाच्या अधिक्षिका मनिषा आंबेडारे, ॲड.रोशनी पटले, ॲड.शबाना अन्सारी उपस्थित होत्या.
प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा मोरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात समाजाच्या मुख्य प्रवाहातील बालकांना शिक्षण, कला व कौशल्य विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होतात. मात्र संस्थांमध्ये राहणाऱ्या अनाथ, निराधार, निराश्रीत बालकांना या संधी हमखास मिळतीलच असे नाही, अशा बालकांच्या क्रिडा व सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तरावर चाचा नेहरु बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरते असे प्रतिपादन जिल्हा कार्यक्रम अधिकारी किर्तीकुमार कटरे यांनी यावेळी केले.
पहिल्या दिवशी 10 जानेवारीला सांघिक खेळाची सुरुवात मशाल पेटवून मुलांची कबड्डी स्पर्धा. 100 मिटर धावण्याची शर्यत, लांब उडी, मुलांची आणि मुलींची कबड्डी स्पर्धा मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या.
दुसऱ्या दिवशी 11 जानेवारीला बुध्दीबळ स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चमचा गोळी स्पर्धा, बेडूक उड्या, संगीत खुर्ची, गीतगायन, वेशभूषा, लोकनृत्य स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
तिसऱ्या दिवशी 12 जानेवारीला पोलीस उपअधीक्षक रामदास शेवते, जिल्हा क्रिडा अधिकारी अनिराम मरस्कोल्हे, पोलीस निरिक्षक शहर पोलीस स्टेशन गोंदिया किशोर पर्वते, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे, प्राचार्य अग्रवाल, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष देवका खोब्रागडे, जयश्री कापगते, मनोजकुमार राहागंडाले, अलका बोकडे, वर्षा हलमारे, चंदना दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.
तीन दिवसीय बाल महोत्सवामध्ये शासकीय मुलांचे निरिक्षणगृह बालगृह, बाल संगोपन योजनेअंर्तगत सर्व संस्था, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी, वेदांती, प्रज्ञा, कल्याणी, नवजीवन, आदिवासी बहुउद्देशीय प्रवर्तक संस्था, जे.एम. हायस्कूल, नगर परिषद प्राथमिक व हायस्कूल, लिटिल फ्लावर व इतर शाळांनी सहभाग घेतला होता.
महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा मोरे यांच्या नेतृत्वात महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, वन स्टॉप सेंटर, सर्व अभय केंद्र, शासकीय मुलांचे निरिक्षणगृह बालगृह, आसरा शिशुगृह, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील परिविक्षा अधिकारी, संरक्षण अधिकारी, विधी सल्लागार यांनी यामध्ये सहभाग दर्शविला.
या बाल महोत्सव कार्यक्रमात एकूण 400 मुलांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. अशाप्रकारचे महोत्सव मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात आणि त्यांना समाजाचा एक जबाबदार घटक बनण्यास मदत करतात. ‘आजची मुले उद्याचा भारत घडवतील’ या नेहरुंच्या विचारांना मूर्त रुप देण्याचा या माध्यमातून हा एक प्रयत्न आहे.
कैलाश गजभिये, ‘उपसंपादक’ जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया





