२८ परिवार मंदिरेही लवकरच बडव्यांच्या जोखडातून मुक्त

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंढरपूर-विठ्ठल मंदिरापाठोपाठ आता पंढरपुरात असलेल्या २८ परिवार मंदिरांवरही सरकारी कारभार लागू होणार आहे. गुरुवारी मंदिर समितीने या सर्व मंदिरांवर ताबा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या मंदिरांवरचेही बडव्यांचे वर्चस्व संपुष्टात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विठ्ठल मंदिर बडव्यांच्या जोखडातून मुक्त झाले होते. पण शहरातली २८ मंदिरे अजूनही सरकारी ताब्याखाली आली नव्हती. या मंदिरांसाठी ५६ पुजाऱ्यांची व्यवस्था कशी करायची या विवंचनेतून मंदिर समिती ही मंदिरं ताब्यात घेण्यासाठी टाळाटाळ करत होती. अखेर स्थानिक नागरिकांच्या दबावानंतर न्यायालयाच्या आदेशाच्या ११ महिन्यांनंतर का होईना, पण ही मंदिरे सरकारी अधिपत्याखाली येणार आहेत.
आतापर्यंत थेट बडव्यांच्या खिशात जाणारे या मंदिरांचे उत्पन्न थेट मंदिर समितीकडे जमा होणार असल्याने पंढरपूरच्या विकासाला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही मंदिरे ताब्यात घेताना काही अडचणी आल्यास कायदेशीर लढाई लढू, असे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सांगितले.
त्यामुळे बडव्यांच्या वर्चस्वाला मंदिर समितीच्या या निर्णयाने पुन्हा एक हादरा बसणार आहे. पण, त्याचवेळी या निर्णयानं अनेक वर्ष बडव्यांच्या कोठडीत असलेल्या देवतांचीही सुटका होणार आहे.